३ अल्पवयीन मुलांचा समावेश
वर्धा,
Tractor battery theft case ट्रॅटरच्या बॅटर्या चोरी प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून शहरातून ५ सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या चोरट्यांकडून २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्लीपूर येथील धर्मराज सुपारे (६१) यांनी अल्लीपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तसेच इतर तिघांच्या अशा चार ट्रॅटरमधील बॅटर्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला.
Tractor battery theft case दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रोशन उर्फ गोलू वैद्य रा. कृष्णनगर वर्धा याला ताब्यात घेतले. तसेच आई अम्बे पान सेंटरवर छापा टाकला. तेथे बॅटर्या आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी पोद्दार बगीचा येथील हर्षल पुरी (१९) तसेच ३ अल्पवयीनांना ताब्यात घेतले. चोरट्यांनी दुचाकीच्या साहाय्याने चोरीच्या बॅटर्या येथे आणून पानटपरीत लपवून ठेवल्या होत्या, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले. पोलिसांनी चोरीच्या बॅटर्या, एम. एच. ३२ आर. ०३५३, एम. एच. ३२ झेड. १४५३, एम. एच. १४ एफ. एल. २९२९ क्रमांकाच्या तीन दुचाकी, तसेच ५ मोबाईल असा २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाचही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी अल्लीपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते आदींनी केली.