वेध
नितीन शिरसाट
tradition of holi परंपरा, पर्यावरण आणि सामाजिक एकात्मतेचा, रंगोत्सवाचा होळी हा सण. प्रत्येक सणामागे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक पर्यावरणीय असा बहुआयामी अर्थ दडलेला असतो. फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी होळी हा केवळ रंगांचा उत्सव नसून तो अन्यायावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचे अधिराज्य, समाजातील विविध घटकांमधील ऐक्यांचे प्रतीक आहे. आजच्या आधुनिक काळात होळीचे रूप काही प्रमाणात बदलले असले, तरी ग्रामीण भागात, तांड्यांत, यात्रांमध्ये आणि परंपरागत समाजरचनेत तिचे मूळ स्वरूप जपलेले दिसते. पर्यावरणपूरक होळी, बंजारा समाजाची पारंपरिक होळी, महिलांची लाठीमार परंपरा, वर्धा जिल्ह्यातील रंगाविना धार्मिक स्पर्धा, स्वच्छतेचा संदेश देणारे सूरगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी बाबा यात्रेतील सामूहिक होळी या सर्व उदाहरणांतून होळीचे विविध रंग आपल्याला पाहायला मिळतात. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेत दरवर्षी होळीला लाखो भक्त येतात. या दिवशी नारळाची होळी पेटवली जाते. हे नारळ ओवाळून होळीत टाकल्याने अंगातील व्याधी दूर होते, अशी भावना आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी तब्बल 15 ते 20 ट्रक भरतील एवढ्या नारळांची होळी येथे केली जाते. काही वर्षांत रासायनिक रंग, पाण्याची उधळपट्टी आणि प्लॅस्टिक कचèयामुळे होळीचा सण पर्यावरणासाठी चिंतेचा विषय बनला होता.
मात्र, आता जनजागृतीमुळे परिस्थिती बदलत आहे. नैसर्गिक रंगांचा वापर, सुया फुलांपासून तयार केलेले गुलाल, पाण्याचा संयमित वापर तसेच होळीच्या दहनासाठी कचरा किंवा प्लॅस्टिकऐवजी सेंद्रिय साहित्य वापरण्याकडे कल वाढतो आहे. पर्यावरणपूरक होळी म्हणजे केवळ पर्यावरणाचे रक्षण नव्हे तर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडविण्याची जबाबदारी स्वीकारणे होय. अनेक स्वयंसेवी संस्था आणि शाळा मुलांना ‘एक झाड लावा, होळी साजरी करा’ असा संदेश देत आहेत. काही ठिकाणी होळीच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. परंपरेतील होळी ही समाजशुद्धीचे प्रतीक होती. गावातील कचरा गोळा करून तो होळीत टाकण्याची पद्धत स्वच्छतेचा संदेश देणारी होती. आज त्याच परंपरेला आधुनिक पर्यावरण-जागरूकतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. भारतातील प्रसिद्ध ‘लाठीमार होळी’ ही परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. विशेषतः बरसाना आणि नंदगाव येथे महिलांची लाठीमार होळी मोठ्या उत्साहात साजरी होते. या परंपरेनुसार महिलांकडून पुरुषांना प्रतीकात्मक लाठीने मारले जाते आणि पुरुष ढालीने त्याचा बचाव करतात. ही परंपरा स्त्रीशक्तीचे प्रतीक मानली जाते. समाजातील स्त्री-पुरुष समानतेचा संदेश या खेळकर विधीतून दिला जातो. महिलांना अभिव्यक्तीची आणि नेतृत्वाची संधी देणारा हा सांस्कृतिक उपक्रम आहे. वर्धा जिल्ह्यातील सूरगाव येथे 28 वर्षांपासून रंगांविना होळी साजरी केली जाते. तीन दिवस धार्मिक कीर्तन, भजन, प्रवचन आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. रंगांची उधळण न करता आध्यात्मिक वातावरणात सण साजरा करण्याचा हा प्रयत्न आहे. युवक-युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा, भजन स्पर्धा आणि सामाजिक विषयांवर चर्चा आयोजित केल्या जातात. या उपक्रमांमुळे सणाला बौद्धिक आणि सांस्कृतिक दिशा मिळते. धार्मिक भावनेसोबत समाजप्रबोधनाची जोड दिली जाते. स्वच्छतेचा संदेश देणारे सूरगाव येथे होळीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्याची परंपरा आहे. गावकरी होळीपूर्वी संपूर्ण गावाची साफसफाई करतात. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे आणि शाळा स्वच्छ केली जातात. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हा संदेश देत होळी साजरी केली जाते. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे जाम नदीच्या काठावर पोळ्याच्या दुसèया दिवशी भाद्रपद अमावास्येला पारंपरिक गोटमार होळी साजरी केली जाते. यात पांढुर्णा आणि सावरगावचे लोक एकमेकांवर दगडांचा गोट वर्षाव करतात. हा एक अतिशय धाडसी आणि ऐतिहासिक वारसा आहे. या परंपरेत दगडांचा वापर केला जात असल्याने प्रशासनाकडून सुरक्षेची खबरदारी घेण्याचे प्रयत्न केले जातात. बंजारा समाजाची पारंपरिक होळी ही जितकी अग्निपूजेसाठी ओळखली जाते, तितकीच ती होळी गीतांच्या समृद्ध परंपरेसाठीही प्रसिद्ध आहे.tradition of holi जिल्ह्यातील विविध तांड्यांमध्ये होळीच्या रात्री गायली जाणारी ही पारंपरिक गीतं आजही बंजारा समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचे जिवंत प्रतीक मानली जातात. होळी पेटवण्याच्या वेळी आणि त्यानंतर तांड्यातील स्त्री-पुरुष एकत्र येऊन फेरा धरतात. ढोल, तिमकी आणि टाळांच्या ठेक्यावर गायली जाणारी ही गीते पिढ्यान्पिढ्या तोंडी परंपरेने पुढे आली आहेत. होळीची अनोखी परंपरा आजही कायम आहे.
9881717828