पशुप्रदर्शनात उमरखेड तालुक्याची दमदार कामगिरी

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
विजेत्यांची जल्लोषात मिरवणूक

उमरखेड, 
यवतमाळ येथे आयोजित जिल्हास्तर 'Agriculture and Livestock Exhibition 2026' कृषी व पशुप्रदर्शन 2026 मध्ये उमरखेड तालुक्यातील पशुपालकांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. उत्कृष्ट संगोपन, पालन व सुदृढता या निकषांवर बैलजोडी, म्हैस, शेळी व कुक्कुट गटांमध्ये विजेत्यांची निवड करण्यात आली. या यशाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने विजेत्या पशुपालक व त्यांच्या पशूंचा गुलाल उधळून सन्मान केला. यावेळी उपस्थितांनी आनंद व्यक्त करत विजेत्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये ढानकीचे शेख निसार शेख मतलब यांनी शेळी गटात द्वितीय क्रमांक मिळवत 4 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. उमरखेडचे अंकुश सुभाष इसळकर यांनी कुक्कुट गटात द्वितीय क्रमांक मिळवत 7 हजार रुपये जिंकले.
 
 
DAMDAR
 
'Agriculture and Livestock Exhibition 2026'  उमरखेडचे सतीश संजय जाधव यांनी म्हैस ‘ई’ गटात द्वितीय क्रमांक मिळवत 15 हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले, तर उमरखेडचेच पवन विष्णू पोहरकर यांनी म्हैस गटात तृतीय क्रमांकासह 10 हजार रुपये मिळवले. बैलजोडी गटात सतीश वामन मोहिते यांनी प्रथम क्रमांक पटकावत 20 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. उमरखेडचे विजय लिंबाजी मोहिते यांनी द्वितीय क्रमांकासह 15 हजार रुपये, तर धानोराचे संतोष साहेबराव काळे यांनी तृतीय क्रमांकासह 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विजेत्या पशुपालकांनी आपल्या पशूंंसह छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत बँडबाजासह भव्य मिरवणूक काढली. वाजतगाजत निघालेल्या या मिरवणुकीने शहराचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. या यशामुळे उमरखेड तालुक्यातील पशुपालकांच्या कष्टाचे व उत्तम संगोपनाचे पुन्हा एकदा कौतुक झाले आहे.