दोन अल्पवयीन बहिणींचा बालविवाह थांबवला

*महिला व बालविकास विभाग आणि स्वयंसेवी संस्थेची कारवाई

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
वर्धा,
child-marriage : सुकळी बाई येथील हनुमान मंदिरात दोन अल्पवयीन बहिणींचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच महिला व बालविकास विभाग आणि स्वयंसेवी संस्थेच्या संयुत कारवाईने हा बालविवाह उधळून लावण्यात आला. ही कारवाई रविवार २९ रोजी करण्यात आली.
 
 
K
 
 
 
सुकळी बाई येथे दोन अल्पवयीन बहिणींचा बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना तात्काळ माहिती देण्यात आली. यावेळी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी व सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सेविका यांनी बालिकेच्या जन्म नोंदणी बाबतचा तपास घेतला असता बालिका १८ वर्षाच्या आत असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांनी पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड यांचे सहकार्य घेऊन घटनास्थळ गाठले.
 
 
ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण आत्राम, योगेश घुगे, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, सूरज वानखेडे, माधुरी शंभरकर, जयश्री निवल, रंजना गोमासे, अंगणवाडी सेविका मीरा वरठी, आशा वर्कर नम्रता खैरकार, पोलिस कर्मचारी शरद धोंगडे, पोलिस पाटील देवराज करलुके, आकाश सोनुले, विलास भेंडे, ग्रामीण मुती समस्या ट्रस्ट स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी संतोष ढोणे, वैभव भांदककर, स्वराज मित्र संस्थेचे धनराज कोल्हे यांच्या सहकार्याने बालविवाह थांबविण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण आत्राम यांनी मुला-मुलींच्या आईवडील व नातेवाईकांकडून मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असा जबाबनामा लिहून घेतला. यासोबतच मुलीचा विवाह १८ वर्षाच्या आत करण्याचा प्रयत्न केल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली.