२३ देशांमध्ये कोविड-१९ चा पुन्हा फैलाव

सिकाडा बीए.३.२ प्रकारामुळे चिंता

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Concerns over Cicada BA.3.2 variant कोविड-१९ विषाणूचा ओमिक्रॉन उप-प्रकार बीए.३.२, ज्याला ‘सिकाडा’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या २३ देशांमध्ये हा आढळत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा नवीन प्रकार शांतपणे पसरत असून त्यामध्ये असामान्य प्रमाणात उत्परिवर्तने आहेत, ज्यामुळे सध्याच्या प्रतिकारशक्ती आणि लसींना तो चकमा देऊ शकतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या माहितीनुसार हा प्रकार सर्वप्रथम नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ओळखला गेला. सिकाडा प्रकाराचे नाव गोंगाट करणाऱ्या कीटकाच्या प्रेरणेने ठेवण्यात आले आहे कारण तो काही वर्षे लक्षात न येता अचानक मोठ्या प्रमाणावर उदयास आला.
 
Cicada BA.3.2 variant
 
तज्ज्ञांची वाढली चिंता
बीए.३.२ च्या स्पाइक प्रोटीनमध्ये अंदाजे ७० ते ७५ उत्परिवर्तने आढळतात, जे विषाणूला मानवी पेशींशी चिकटण्यास मदत करतात. तुलनेत इतर अलीकडील प्रकारांमध्ये ३० ते ४० उत्परिवर्तने आढळतात. या बदलांमुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे की या प्रकारामुळे पूर्वीच्या संसर्गामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती किंवा सध्याच्या लसींवर प्रभाव कमी होऊ शकतो. नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर ब्रँडन डायोन म्हणाले, त्यामध्ये बरीच उत्परिवर्तने असल्याने सध्याच्या लसी फारशी प्रभावी ठरणार नाहीत अशी शक्यता आहे.
बीए.३.२ चे लक्षणे इतर अलीकडील प्रकारांप्रमाणेच आहेत, ज्यात घसा खवखवणे, खोकला, नाक चोंदणे, थकवा, डोकेदुखी, ताप आणि काहींना पोटाची गडबड, मळमळ किंवा जुलाबाचा अनुभव येऊ शकतो. सीडीसीच्या माहितीनुसार, सुमारे १५ महिन्यांपूर्वी पहिल्यांदा ओळखल्यापासून या वर्षी ११ फेब्रुवारीपर्यंत हा प्रकार अमेरिकेतील किमान २५ राज्यांमध्ये १३२ मॉनिटरिंग साइट्सवर आढळून आला आहे. अमेरिकेतील विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून गोळा केलेल्या नाकातील स्वॅबच्या नमुन्यांमधूनही याची ओळख पटली आहे.