एकनाथ खडसे आणि कन्येविरोधात फसवणुकीचा गुन्हा

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
जळगाव,
Crime against Eknath Khadse जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोप आहे की साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनीचा गैरफायदा घेतला गेला. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती चमेलाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ खडसे, शारदा खडसे, मध्यस्थ सुधाकर पाटील आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या पोलीस तपास करत आहेत. अनेक वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या जमिनीच्या व्यवहारामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

AS5 
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण २००२ सालातील असून भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ ही जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांची होती. फिर्यादीनुसार, एकनाथ खडसे यांनी या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ सुरू करण्याचे आमिष दाखवले आणि जमिनीचा खरेदीचा प्रस्ताव मांडला. त्यांनी चांगला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. चमेलाबाई तायडे यांच्या मते, खडसे यांनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत ५१ हजार रुपये आगाऊ घेतले आणि सर्वांचे अंगठे घेऊन जमिनीची खरेदी बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवली. मात्र अनेक वर्षे उलटूनही कारखाना उभारला गेला नाही. २०२५ मध्ये कुटुंबाने ही जमीन तपासली असता, ती कारखान्याच्या नावावर न राहता शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची तपासणी केल्यावर धक्कादायक फेरफार उघडकीस आले. खरेदीखतामध्ये जिथे ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ असे नाव होते, तिथे खाडाखोड करून ‘शारदा एकनाथ खडसे’ असे नाव लिहिले गेलेले आढळले. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.