मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शबरी महामंडळाचा गौरव

‘सेवाकर्मी प्लस’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
devendra-fadnavis : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘सेवाकर्मी प्लस’ या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने ‘सार्वजनिक उपक्रम’ कंपनी संवर्ग या श्रेणीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. यशाबद्दल शनिवार २८ मार्च रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (भाप्रसे) यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल (भाप्रसे) उपस्थित होते.
 
 
KJL
 
 
 
भारतीय गुणवत्ता परिषदेने (यू.सी.आय.) केलेल्या मूल्यमापनात शबरी महामंडळाने १०० पैकी ८४ गुण मिळवून प्रशासकीय गतिमानतेत राज्यात अव्वल स्थान मिळवले. या यशात प्रामुख्याने ९ घटकांचा समावेश होता. यामध्ये सेवा कर्मचारी प्रशिक्षण कर्मचार्‍यांचे आयगॉट पोर्टलवरील प्रशिक्षण आणि सेवा पुस्तके अद्ययावत करणे, आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे, ज्येष्ठता सूची, पदोन्नती आणि बिंदूनामावलीची तंतोतंत अंमलबजावणी यांसारख्या विषयांचा समावेश होता.
 
 
केवळ प्रशासकीय कामातच नव्हे तर आदिवासींच्या उत्पादनांना हकाची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळाने ‘शबरी नॅचरल्स’ हा ब्रॅण्ड विकसित केला आहे. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे या ब्रॅण्डची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता अधिक वाढणार असून आदिवासी उत्पादने जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या यशाबद्दल व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 
 
आदिवासींच्या विकासासाठी कटीबद्ध : बनसोड
 
 
पुरस्कार म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे. या यशामुळे आदिवासी विकास आणि विपणन व्यवस्था अधिक बळकट करण्याची नवी ऊर्जा मिळाली असून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रीया शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी व्यत केली.