केकेआरला फटका...महागडा ग्रीन फ्लॉप

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
कोलकाता,
Expensive green flop कॅमेरॉन ग्रीन हा इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाने या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूवर तब्बल २५.२ कोटी रुपये खर्च केले. मात्र, स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिल्याने संघाला मोठा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे.मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून २२० धावांचा मोठा डोंगर उभा केला. या डावात सुरुवातीला अजिंक्य रहाणे आणि फिन ॲलन यांनी चांगली सुरुवात करून संघाला भक्कम पाया दिला होता. संघाची धावसंख्या अवघ्या ५.२ षटकांत ६९ धावांवर पोहोचली होती.
 


Expensive green flop 
 
या मजबूत स्थितीत ग्रीन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याचा डाव फार काळ टिकला नाही. त्याने केवळ १० चेंडूत १८ धावा केल्या आणि शार्दुल ठाकूर यांच्या गोलंदाजीवर त्याचा झेल टिपण्यात आला. पूर्णपणे तंदुरुस्त असूनही त्याने या सामन्यात एकही षटक टाकले नाही.मुंबईने २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९.१ षटकांत ६ गडी राखून सहज विजय मिळवला. त्यामुळे कोलकाताचा पराभव झाला आणि महागड्या खेळाडूकडून अपेक्षित योगदान न मिळाल्याची चर्चा सुरू झाली.
 
 
संघाने ग्रीनवर केलेल्या मोठ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कामगिरीचे विश्लेषण केले असता, प्रति सामन्याचा सरासरी खर्च जवळपास १.८ कोटी रुपये इतका ठरतो. मात्र या सामन्यात त्याचा प्रभाव त्यापेक्षा खूपच कमी राहिला. उपलब्ध आकडेवारीनुसार, त्याच्या खेळीचा प्रभाव सुमारे ६३ लाख रुपयांपर्यंतच मर्यादित राहिला. यामुळे एका सामन्यातच संघाला अंदाजे १ कोटीपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागल्याचे बोलले जात आहे.ग्रीनचा धावगती दर चांगला असला तरी सामन्याच्या निकालावर त्याचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. त्यामुळे या महागड्या खेळाडूकडून पुढील सामन्यांमध्ये मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.