गोंदिया जिल्ह्याला मिळणार ६० हजार लिटर केरोसिन

- प्रायोगिक तत्वावर २० हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ - अंत्योदय योजनेचे अतिगरजू लाभार्थीच ठरणार पात्र

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
gondia-district-will-get-kerosene : एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही लवकरच केरोसिन वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात गोंदिया जिल्ह्याकरीता ६० हजार लिटर केरोसिनचा पुरवठा करण्यात येणार असून प्रति कुटूंब ३ लिटर याप्रमाणे केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. यानुसार प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील २० हजार अंत्योदय लाभार्थ्यांमधून अतिगरजू लाभार्थ्यांना सर्वप्रथम याचा लाभ मिळणार आहे.
 
 
J
 
अखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढता यावा यासाठी राज्यात केरोसिन पुरवठा करण्यात येणार आहे. यात केंद्र शासनाकडून राज्याला एकूण ३,७४४ किलोलीटर केरोसिन मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांना प्रति कुटुंब / शिधापत्रिकेनुसार ३ लिटर केरोसिन दिले जाणार आहे. योजनेत अंत्योदय व प्राधान्य कुटूब शिधापत्रिकाधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब तसेच स्थलांतरित मजूर यांनाही केरोसिन उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 
 
शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांसाठी ग्रामपंचायत रहिवासी दाखला तर स्थलांतरितांसाठी शासन मान्य ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, केरोसिनच्या दराबाबत शासन स्तरावर विचार सुरू असून, यासंदर्भात स्वतंत्र आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रायोगिक तत्वावर गोंदिया जिल्ह्यासाठी ६० हजार लिटर केरोसिन पुरवठा करण्यात येणार असून प्रति कुटूंब ३ लिटर प्रमाणे विचार करता २० हजार लाभार्थी कुटूंबाला केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. यात विशेष म्हणजे, केवळ अंत्योदय योजनेतील अतिगरजू, ज्यांचेकडे गॅस कनेक्शन नाही, निराधार, दिव्यांग, विधवा यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तर यासाठी प्रत्येक गावातील दक्षता समितीला तसे निर्देश देण्यात येणार आहेत. समितीतर्फे तशा पात्र लाभार्थी कुटूंबाची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, केरोसिनच्या वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हास्तरावर संयुक्त निरीक्षण पथके स्थापन करण्यात येणार असून, केरोसिनचा गैरवापर किंवा पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
गोंदिया जिल्ह्यासाठी प्रायोगिक तत्वावर ६० हजार लिटर केरोसिन मंजूर करण्यात आले आहे. यात २० हजार अंत्योदय त्यातही अतिगरजूंना प्रथम प्राधान्य दिले जाईल. यानंतर जिल्ह्यात किती गरजू लाभार्थी आहेत व किती लिटर केरोसिनची गरज आहे. याची सहनिशा करून त्यानुसार मागणी करण्यात येईल.
- प्रकाश अगाव पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया