अखेर ... प्राचार्य लोंढे निलंबीत

- जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई - गोरेगाव येथील शाळा समितीच्या ‘शाळाबंद आंदोलन’ला यश

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
prabhakar-londhe-suspended : गोरेगाव येथील पीएमश्री शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर लोंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन येथील शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी ७.३० वाजतापासून शाळाबंद आंदोलन पुकारले असता जिल्हा प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राचार्य लोंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
 
K
 
प्राचार्य लोंढे यांच्यावर महाविद्यालयात आर्थिक घोळ केल्याचे आरोप करीत येथील शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या असताना मागील ३० डिसेंबर २०२५ रोजी शाळाबंद आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांनी १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही कारवाई होत नसल्याचे पाहून पालकांनी पुन्हा सोमवारी सकाळपासून शाळाबंद आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची दखल घेत जि.प. शिक्षण विभागाकडून सायंकाळ ५ वाजतापर्यंतची वेळ आंदोलकांना मागितली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास प्राचार्य लोंढे यांना तत्काळ प्रभावाने निलंबीत करत असल्याचे पत्र जारी केले आहे. सदर पत्रानुसार लोंढे यांच्या विरोधात ३० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेले आंदोलन व तक्रारीची दखल घेत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीकडून १९ जानेवारी २०२६ रोजी अहवाल प्राप्त झाला असून सदर चौकशी अहवालात मुख्याध्यापक लोंढे, यांचे विरूद्ध बहुतांश आरोप सिद्ध होत असल्याचे तसेच तक्रारीची व्याप्ती विचारात घेता त्यांचे विरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुख्याध्यापक लोंढे यांनी आपल्या कर्तव्यात आर्थिक अनियमितता व पदीय कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मधील ३ अन्वये आपले कर्तव्य बजावित असताना सदर नियमाचा भंग केल्यामुळे शिस्तभंगाचे कार्यवाहीस पात्र ठरवत त्यांचे विरूद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ४ मधील तरतुदीनुसार त्यांच्यावर तात्काळ प्राभावाने निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे.
 
 
यांनीही दिला होता पाठींबा
 
 
पालक व शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आलेल्या या आंदोलनाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, नगराध्यक्ष तेजराम बिसेन, न.पं. सभापती पवन रहांगडाले, नगरसेवक राहुल चंद्रिकापूरे यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला होता.