महागावातील विविध विकास कामांसाठी 9.70 कोटींचा निधी

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
नपं उपाध्यक्ष, माजी नप अध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश

महागाव, 
Mahagaon Nagar Panchayat शहरातील दलित वस्तीसह जलशुद्धीकरण केंद्रांची संरक्षक भिंत, समाज कल्याण शाळेचा रस्ता यांसह विविध विकास कामांसाठी 9 कोटी 70 लाखांचा निधी राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आला. याकरिता नगर पंचायत उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, माजी नप अध्यक्ष करुणा नारायण शिरबिरे आणि नगरसेवक सुजितसिंह ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने शहरवासींनी समाधान व्यक्त केले आहे. महागाव नगर पंचायतमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास कामाचा सपाटा सुरू असून शहरातील दलित वस्ती, समाज कल्याण शाळेकडे जाणारा रस्ता, घनकचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्राला संरक्षक भिंत यांसह विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.
 
 
mahagav
 
याकरिता उबाठा शिवसेना नेते व नपं उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, माजी नपं अध्यक्ष करुणा शिरबिरे व नगरसेवक सुजितसिंह ठाकूर यांनी मागील तीन वर्षे निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु याठिकाणी असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. परंतु नुकताच याठिकाणी भाजपचा नगर पंचायत अध्यक्ष विराजमान झाला आहे. भाजपचा नपं अध्यक्ष विराजमान होण्यासाठी मदत करणारे नपं उपाध्यक्ष भरवाडे, माजी नपं अध्यक्ष शिरबिरे व नगरसेवक ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार किसन वानखेडे व भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी शासनाकडे हा निधी मंजूर करण्याची मागणी केली.
 
 
 
Mahagaon Nagar Panchayat  त्यानुसार महागाव शहरात अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेंतर्गत 2 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये 1 कोटी 49 लाख, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 91 लाख, प्रभाग क्रमांक 17 मध्ये 30 लाख रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील विविध विकास कामांसाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 1 कोटी 26 लक्ष रुपयांसह प्रभाग 10 मधील जलशुद्धीकरण केंद्राची संरक्षण भिंत 40 लक्ष, फुलसावंगी रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरून समाज कल्याण शाळा व त्याच परिसरात असलेल्या विविध शाळांकडे जाणारा रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. नपं उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, करुणा शिरबिरे व सुजितसिंह ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच महागाव नगर पंचायतसाठी एकाच वेळी एवढा मोठा निधी मंजूर झाल्याने शहरवासींमध्ये समाधान आहे.