वर्धा,
fraud-of-customers : ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष देऊन हिंगणघाट येथील टिळक चौकातील निरज अर्बन को. ऑ. निधी लि. अमरावती या शाखेतील संचालक मंडळाने तब्बल १ कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरज अर्बन को ऑप निधी लि. अमरावती, शाखा टिळक चौक, हिंगणघाट येथील संस्थेमध्ये बचत ठेव, दैनिक ठेव, मुदत ठेव काढून व एफ.डी. खात्याच्या माध्यमातून जास्त व्याजदर मिळण्याच्या आशेने मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणुक केली. परंतु, संस्थेतील संचालक मंडळाने ग्राहकांचे पैसे गुंतवणुकदारांना परत न करता स्वतः पैसे वापरून १ कोटी रुपयांनी फसवणूक केली.
या संस्थेच्या माध्यमातून खाते धारकांना जास्त व्याजाचे प्रलोभन व विशेष ठेव योजना, दाम दुप्पट योजना व इतर आकर्षक वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन केला. दैनिक बचत ठेव, मासिक ठेव, बचत ठेव, मुदत ठेव या प्रकारच्या ठेवी स्वीकारून कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. या बँकेच्या माध्यमातून ज्या ग्राहकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.