एनएक्सजी कॉईन गुंतवणूक घोटाळा उघड

*14 लाख रुपयांची फसवणूक, दोघांना अटक

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर, 
nxg-coin-investment-scam : क्रिप्टो करन्सीमध्ये मोठा नफा आणि महिंद्रा एक्सयू 300 वाहन देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्‍या एनएक्सजी कॉईन व एसडी हब प्रायव्हेट लि. या कंपनिविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
J
 
चंद्रपूर शहरातील कार्तीक रमेश खंगार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा उघडकीस आला. खंगार हे इन्व्हेस्ट मॅनेजमेंटचे काम करीत असून त्यांना व इतर गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सी एनएक्सजीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी आयडी तयार करून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 50 हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. तसेच गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल आणि महिंद्रा एक्सयुव्ही 300 वाहन देण्यात येईल, असे खोटे आमिष दाखवण्यात आले.या आमिषाला बळी पडून फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांकडून एकूण 14 लाख रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न देता गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत असून तपासादरम्यान पोलिसांनी रमेश सखाराम भाष्कर (33, रा. स्नेह नगर, परळी वैद्यनाथ, जि. बीड, सध्या शिमलानगर, विजापूर रोड, सोलापूर येथे वास्तव), मंगलदास तुलाराम वरखडे (49, रा. हनुमान मंदिराजवळ, लोहारा, ता. जि. चंद्रपूर) या दोन आरोपींना अटक केली आहे.
 
 
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्‍वर कातकडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अभिषेक बागडे पोलिस उप निरीक्षक नानेश्‍वर श्रीरामे, हवालदार प्रभाकर तलांडे करीत आहेत.