मुंबई,
Parth Pawar meets Raj Thackeray महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये आज एक महत्त्वाची हालचाल पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे युवा नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.आज सकाळी पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि दोघांमध्ये बराच वेळ सखोल चर्चा झाली. मात्र, या भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळल्याने चर्चेचा नेमका विषय अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे या भेटीमागील कारणांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
अलीकडेच घडलेल्या काही घटनांमुळे ही भेट अधिकच महत्त्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन एका प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्या वेळी राज ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी पार्थ पवार यांनी ही भेट घेतली असावी, अशी चर्चा आहे.तसेच अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये पियुष गोयल यांनी एका महत्त्वाच्या पदासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव पुढे केले होते. त्यावर राज ठाकरे यांनी ‘मराठी नेतृत्वाला प्राधान्य मिळाले पाहिजे’ अशी ठाम भूमिका मांडली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याने पवार कुटुंबाकडून आभार व्यक्त करण्याच्या दृष्टीनेही ही भेट झाली असावी, असेही बोलले जात आहे.