राज्यातला पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट अमरावतीत

राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रयोग

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
अमरावती, 
robotic-bottling-plant : शहरातील प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे विद्यार्थ्यांना उद्योग विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अत्याधुनिक रोबोटिक बॉटलिंग प्लांटची स्थापना करण्यात आली. राज्यातला पहिला प्रयोग आहे. यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून हा प्रकल्प साकार झाला आहे. त्यामुळे विदर्भातील तांत्रिक शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे.
 
 
Untitled-1
 
जपानमधील जागतिक कीर्तीच्या यास्कावा रोबोटिक्स कंपनीने सामंजस्य कराराद्वारे हा इंडस्ट्रियल रोबोट विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी संचालित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाला उपलब्ध करून दिला आहे. सुमारे ३६ देशांमध्ये यास्कावा कंपनीचे रोबोट्स विविध उद्योगांमध्ये वापरले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. प्लांटचे उद्घाटन रविवारी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात उत्साहात झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून यास्कावाचे सीईओ अजय गुर्जर, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, तसेच अर्पिता गुर्जर, प्राचार्य डॉ. गजेंद्र आर. बमनोटे, यास्कावा कंपनीचे वरिष्ठ अभियंता संतोष, मोहन गर्जे आणि विशाखा देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
 
 
सदर उपक्रमात महाविद्यालयाचे १९९० च्या बॅचचे माजी विद्यार्थी अजय गुर्जर यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते यास्कावा कंपनीचे भारतातील प्रमुख आहेत. आपण शिकलो त्या महाविद्यालयाला आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा या हेतूने त्यांनी हा रोबोट उपलब्ध करून दिलाय. यापूर्वीही त्यांनी कोरोना काळात सुमारे २५ लाखांचा तांत्रिक सेटअप महाविद्यालयाला दिला आहे. त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनुप शिरभाते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ऋचा कोल्हेकर यांनी केले, तर आभार प्रा. प्रगती मामनकर यांनी मानले.