वाळू तस्कराची अधिकार्‍याला धक्काबुक्की

पोलिसांत गुन्हा दाखल

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
चांदूर बाजार, 
sand-smuggler-punches-officer : अवैध वाळूची तस्करी करणारा ट्रक पकडल्याच्या कारणातून वाळू तस्कराकडून ग्राम महसूल अधिकार्‍याला धक्काबुक्की करणारा धक्कादायक प्रकार तालुक्यातील तोंडगाव फाटा येथे घडला. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल डवरे यांच्या तक्रारीवरून अचलपूर येथील ट्रक मालक मतीन खान याच्याविरुद्ध परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

LK 
 
 
 
घटनेमागील तपशील असा की, ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल डवरे हे चांदूर बाजार येथे तहसील कार्यालयात जात असतांना तोंडगाव फाट्यावरून अवैध वाळूने भरलेला ट्रक संशयास्पदरीत्या गावाकडे जाताना दिसला. प्रफुल्ल डवरे यांनी तात्काळ पाठलाग करून ट्रक थांबवला आणि चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र, चालकाकडे कोणताही वैध परवाना आढळला नाही. यावेळी वाळू तस्करीवर कारवाई सुरू असतानाच ट्रक मालक मतीन खान (रा. अचलपूर) हा घटनास्थळी दाखल झाला. त्याने महसूल अधिकार्‍याशी हुज्जत घालत हमारे पास सब है, ट्रक जाने दो असे म्हणून वाद घातला. इतक्यावरच न थांबता मतीन खान याने डवरे यांना धक्काबुक्की करीत ट्रक बळजबरीने घटनास्थळावरून पोबारा केला.
 
 
शासकीय कामात अडथळा निर्माण करून दशवत माजवणार्‍या विरुद्ध ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल डवरे यांनी तात्काळ परतवाडा पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि अवैध गौण खनिज चोरीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.