कथा कुठेही असो, मैनाबाई हजर असतातच
राजेश माहेश्वरी
आर्णी,
‘आवड असली की सवड मिळतेच’ या म्हणीला सत्यात उतरवण्याचे कार्य करताना दिसत आहे, छत्रपती संभाजीनगर येथील 72 वर्षांच्या मैनाबाई. त्यांना आवड जडली Shiva Mahapuran Katha शिवमहापुराण कथेची. त्यामुळे जिथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण असेल तिथे मैनाबाई उपस्थित असतात. आतापर्यंत मैनाबाईंनी 64 वेळा शिवपुराण ऐकले असून आर्णी येथे 65 वी शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी त्या चार दिवस आधीपासूनच उपस्थित झाल्या आहेत.
मैनाबाई दगडू करटमल या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. पती दगडू करटमल हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. परंतु त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर मैनाबाई यांनी वाहक म्हणून सेवा दिली. नियत वयोमानानुसार त्या 2011 मध्ये सेवानिवृत्त झाल्या. त्यांना एक मुलगा, सून, नातवंडे आहेत. मुलगा चांगल्या नोकरीवर आहे. घरची परिस्थिती आनंदी व उत्साही आहे. मार्च 2019 मध्ये कोरोनासारख्या महामारीने देशात टाळेबंदी लागली होती. तेव्हा मैनाबाईंनी पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा टीव्हीवर ऐकली. ती त्यांना प्रभावी वाटली. त्यामुळे आपण प्रत्यक्ष ऐकावी म्हणून त्या एक वेळा इंदूर येथे गेल्या. तेव्हापासून त्यांना या कथेचा छंदच लागला.
Shiva Mahapuran Katha त्यानंतर ज्या ठिकाणी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात येते त्या ठिकाणी मैनाबाई करटमल उपस्थित रहातात. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर कोणत्याही राज्यात शिवपुराण असो त्या ठिकाणी त्या तयारच असतात. आर्णी येथील त्यांची ही 65 वी शिवमहापुराण कथा असून या नंतरच्या कथा कुठे कुठे आहेत, याचीसुद्धा त्यांना माहिती आहे. या कथेमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच मी त्या कथेत खंड पडू देत नाहीत, असेही मैनाबाई म्हणाल्या.