शिवाजी संस्थेचे अंदाजपत्रक ३५.२० कोटींचे

आमसभेत अंदाजपत्रकास मंजुरी

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
अमरावती,
shivaji-sansthas-budget : विदर्भातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या आमसभेत वर्ष २०२६- २०२७ करिता नऊशे पस्तीस कोटी वीस लक्ष रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. येत्या वर्षाच्या अंदाजपत्रकात संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयांच्या विकासावर व सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. यामध्ये भौतिक विकासासोबतच डिजिटलायझेशन सारख्या सुविधांचा समावेश आहे. नव्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एक अनुदानित महाविद्यालय संस्थेला हस्तांतरित होत असून तसा हस्तांतरण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
 
 
J
 
शिवाजी शिक्षण संस्थेच्या विमलाबाई देशमुख सभागृहात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सन २०२५-२०२६ च्या कार्याचा लेखाजोखा सादर करण्यासोबतच नवीन आर्थिक वर्षाचे ९३५ कोटी २० लक्ष रुपयाचे अंदाजपत्रक सादर केले. सभागृहात उपस्थित सर्व सदस्यांनी या अंदाजपत्रकाला एकमुखाने मंजुरी दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिल्याबद्दल सभेत आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच यापूर्वी संस्थेचे कोणतेही शाळा, महाविद्यालय नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज येथील मोहसीनभाई जव्हेरी हे अनुदानित महाविद्यालय नव्याने संस्थेस हस्तांतरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केल्याने आता गडचिरोली जिल्ह्यातही संस्थेचे महाविद्यालय असणार असल्याने सभेत आनंद व्यक्त करण्यात आला.
 
 
वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढवून दोनशे करण्याचा आणि पदव्युत्तरच्या जागा वाढविण्याचा प्रस्ताव संस्थेतर्फे सादर करण्यात आला असून लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळेल, असा विश्वास अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केला.