आदिवासी समाज नव्या तेजाने उभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Devendra Fadnavis आदिवासी बांधवांना शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हा समाज आता नव्या तेजाने उभा राहिला असून आता हा समाज मागे वळून पाहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
 

Tribal community development Maharashtra,, Devendra Fadnavis 
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार माया इवनाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आ. कृष्णा खोपडे, माजी आ. देवराव होळी, सुधाकर देशमुख, महापौर नीता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  म्हणाले, अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मायाताईंनी अत्यंत संघर्ष करत आपली राजकीय कारकीर्द घडविली आहे. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठे काम केले. अगदी देशपातळीवर फिरून त्यांनी त्यांचे असंख्य प्रश्न सोडवले. त्यामुळेच त्यांना देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांची कारकीर्द अत्यंत निष्कलंक राहिलेली आहे.आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीही भावना व्यक्त केल्या. माया इवनाते म्हणाल्या की,हा सन्मान माझ्या समस्त आदिवासी बांधवांचा आहे.समाजासाठी बरेच काही करायचे आहे. देश बदलत असताना या बदलांमध्ये माझ्या आदिवासी बांधवांचा मोठा वाटा असेल.आदिवासींच्या अनेक संघटना-संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी माया इवनाते यांचा सत्कार केला.
शिक्षणातूनच समाजाची प्रगती- नितीन गडकरी
समाजात ज्ञानाचा प्रसार होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. आदिवासी समाजाची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. संपूर्ण समाज विकासाच्या या यात्रेत सहभागी होईल, तेव्हा त्या समाजाला दिशा देण्याचे कार्य मायाताईंसारख्या नेतृत्वाला करावे लागेल. समाज आज त्यांच्याकडे अत्यंत आशेने पाहतो आहे. मायाताईंचे जीवन अत्यंत कठीण परिस्थितीत व संघर्षात गेले. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक जबाबदारीचा वापर त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी केला आहे. त्यांच्या नेतृत्वात समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीकडे वाटचाल करेल.