‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन

- जिप अध्यक्ष भेंडारकर यांचे प्रतिपादन - विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे उद्घाटन

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
umed-rural-woman : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान (उमेद) हे केवळ योजना नसून ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सशक्त माध्यम आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. प्रितम लॉन, गोंदिया येथे आयोजित विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
 
 
JK
 
यावेळी जि.प. सदस्य जितेंद्र कटरे, उमेश्वरी बघेले, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले व माजी जि.प. सभापती पुजा सेठ उपस्थित होते. भेंडारकर पुढे म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात प्रथमच विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव होत आहे. या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळेल. ‘उमेद’च्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
 
 
या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेले विविध उत्पादने आहेत. यामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, कपडे, तसेच इतर स्थानिक उत्पादने ही त्यांच्या कष्टाची व कौशल्याची साक्ष देतात असे त्यांनी सांगितले. रविवारपासून हे तीन दिवशीय विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव सुरु झाले असून यामध्ये ग्रामीण समुहातील महिलांनी बनवलेल्या आकर्षक वस्तु, हस्तकला आणि गृहउपयोगी वस्तु उपलब्ध आहेत. ग्रामीण महिलांनी तयार केलेले मसाले, लोणची, पापड आणि सेंद्रीय धान्य एकाच छताखाली उपलब्ध आहे. विदर्भातील अस्सल चवीच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी आहे. महोत्सवात गोंदिया जिल्ह्यासह नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर व वर्धा या जिल्ह्यातील महिला बचत गटांचे एकूण ७५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत.