जि. म. बँक चुरशीच्या निवडणुकीत विश्वनाथ ताथोड विजयी

मतविभाजन ठरले निर्णायक

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड, 
vishwanath-tathod : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा येथील संचालक पदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विश्वनाथ ताथोड यांनी केवळ तीन मतांच्या अल्प फरकाने विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला. या निकालानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला असून, राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
 
 
JK
 
रविवार, २९ मार्च रोजी कारंजा येथील विद्याभारती प्रायमरी शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, सर्व ६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून १०० टक्के मतदान नोंदवले. निवडणुकीत विश्वनाथ ताथोड, दिगंबर वानखडे आणि रत्नमाला श्रीधर कानकीरड यांच्यात तिरंगी लढत झाली होती. सोमवार, ३० मार्च रोजी अकोला येथे मतमोजणी झाली. त्यामध्ये विश्वनाथ ताथोड यांना २८ मते, दिगंबर वानखडे यांना २५ मते, तर रत्नमालाबाई कानकीरड यांना ८ मते मिळाली तर एक मत अवैद्य ठरले. या निकालामुळे ताथोड यांनी केवळ ३ मतांच्या फरकाने विजय संपादन केला.
 
 
विरोधी मतांचे विभाजन ठरले निर्णायक
 
 
या निवडणुकीत विरोधी मतांचे विभाजन हेच ताथोड यांच्या विजयाचे प्रमुख कारण ठरल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. तिरंगी लढतीमुळे विरोधकांचे मत एकवटले नाही, याचा थेट फायदा ताथोड यांना झाला. दरम्यान, इतया कमी फरकाने लागलेला निकाल आगामी निवडणुकांसाठीही संकेत देणारा ठरत आहे. प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणारा हा निकाल असून, स्थानिक पातळीवरील राजकारणात समीकरणे कशी झपाट्याने बदलू शकतात, याचे हे उदाहरण मानले जात आहे.
 
 
अकोला - वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत वाशीममधुन धनंजय गोरे, मंगरुळनाथ मधून राम सुभाष ठाकरे, नितीन दिलीप जाधव, रिसोड मधुन शोभाबाई सुभाष झनक, मानोरा मधुन अरविंद इंगोले यांनी विजय मिळविला.
छायाचित्र - विश्वनाथ ताथोड