बाई गंगाबाई रुग्णालयात मातेचा मृत्यू

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
- जननी सुरक्षा योजनेवर प्रश्नचिन्ह

गोंदिया, 
Bai Gangabai Hospital ताप, बी. पी. आणि पोटात दुखणे अशी लक्षणे असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा येथील एका मातेला २८ मार्च रोजी येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु, या मातेचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला. अवघ्या १६ दिवसांपूर्वीच गोंडस बाळाला जन्माला घातलेल्या या मातेने अचानक जगाचा निरोप घेतल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोबतच शासनाच्या जननी सुरक्षा योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
ganga
 
Bai Gangabai Hospital  सडक अर्जुनी तालुक्याच्या राजगुडा येथील पौर्णिमा योगेश मस्के (२२) हिला प्रसुतीकळा सुरू झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला १६ दिवसांपूर्वी येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात भरती केले होते. तिची नार्मल प्रसुती झाल्याने तिला दुसर्‍या दिवशी सुटी देण्यात आली. परंतु, मध्यंतरी तिला ताप, बी. पी. आणि पोटात दुखणे अशी लक्षणे सुरू झाली. त्यामुळे तिला २८ मार्च रोजी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर असल्याने तिला येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे तिच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. परंतु, ताप कमी होत नसल्याचे तेथील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बाई गंगाबाई महिला रुग्णालयातीलच अतिदक्षता विभागात तिला हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच पौर्णिमाने २९ मार्च रोजी रात्रीला जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर कुठे हळहळ, तर कुठे आरोग्य व्यवस्थेवर संताप व्यक्त केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, एका बाजूला मुंबईहून सहसंचालक येऊन बैठका घेतात, आढावे घेतात आणि ‘सर्व काही सुरळीत’असल्याचे चित्र रंगवतात. मात्र, प्रत्यक्षात अशा घटना घडत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर शंका उपस्थित होत आहे. कागदोपत्री व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष सेवा यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र या घटनेतून समोर आले आहे.
शवविच्छेदनास नातेवाइकांचा नकार
पौर्णिमा मस्के हिच्या मृत्युनंतर तिच्या नातेवाइकांनी रोष व्यक्त करीत शवविच्छेदनाकरिता नकार देत मृतदेह वाहनात मांडला होता. हा मृतदेह घेऊन जात असल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी भ्रमणध्वनीवरून तिच्या नातेवाइकांशी संपर्क करीत मृतदेह परत रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणावा, असे सांगितल्याने नातेवाईक माघारी फिरले. त्यानंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.