प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय

आसाममध्ये भाजपाचा जाहीरनामा

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
दिसपूर,
BJP's manifesto in Assam आसाममध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पक्ष ने आपले निवडणूक घोषणापत्र जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या संकल्पपत्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी हिमंत बिस्वा सरमा, सरबानंद सोनोवाल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया उपस्थित होते. राज्यातील १२६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या या संकल्पपत्रात विकासावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विद्यापीठ उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
 
 
BJP
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पुढील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सुमारे दोन लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. तसेच पूरमुक्त आसाम घडवण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांचा विस्तार करण्यावरही भर देण्यात आला आहे. दरम्यान, जाहीरनामा तयार करताना राज्यभरातील नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. लाखो लोकांच्या सहभागातून तयार झालेल्या या दस्तऐवजाच्या आधारे पुढील कार्यकाळात काम करण्याचा पक्षाचा मानस आहे. या घोषणांमुळे आसामच्या निवडणुकीत राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी काळात यावरून जोरदार राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.