मुंबई,
Consequences of the Iran-US war मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आता फक्त त्या प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा प्रभाव जागतिक पातळीवर जाणार आहे. राज्यसभेत झालेल्या चर्चेत खासदारांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. विशेषतः पर्यावरणीय आणि कृषी क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांबाबत त्यांनी इशारा दिला. शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात सांगितले की, इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्ष महिन्याहून अधिक काळ सुरू आहे आणि त्याचे परिणाम हळूहळू इतर देशांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांनी नमूद केले की, इराणमधील हवाई हल्ले आणि स्फोटांमुळे निर्माण झालेले प्रदूषण भारतासाठीही धोकादायक ठरू शकते. आपल्यावर बॉम्ब पडत नसले तरी इराणवर घोंघावणारे ‘काळे ढग’ तितकेच घातक ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.

तेहरान आणि आसपासच्या भागात झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि गॅस साठवणूक केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून, वातावरणात सल्फर, नायट्रोजन ऑक्साईडसारखी घातक रसायने पसरली आहेत. या प्रदूषणाचे परिणाम भविष्यात भारतातही दिसू शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः गुजरात, राजस्थान आणि पंजाब या पश्चिमेकडील राज्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या भागातील शेती, पशुधन आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पर्यावरण तज्ज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञांनी देखील याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारचे प्रदूषण वाऱ्याच्या दिशेनुसार दुसऱ्या देशांमध्येही पोहोचू शकते. इराणमधील काही भागांमध्ये ‘काळा पाऊस’ पडल्याचे समोर आले आहे, जो विषारी घटकांनी युक्त असल्यामुळे अत्यंत धोकादायक आहे. भारतातही अशा आम्लवर्षेची शक्यता लक्षात घेतली गेली आहे.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावू शकते, जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते आणि पिकांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. युद्धामुळे इंधन, एलपीजीसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत असल्याने दरवाढ आणि तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.