नवी दिल्ली,
bab-el-mandeb-strait : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता केवळ युद्धापुरता मर्यादित राहिलेला नाही. या संघर्षामुळे जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि महत्त्वाचे समुद्री मार्ग धोक्यात आले आहेत.
या युद्धामुळे जगातील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ जवळपास बंद झाला आहे. त्यानंतर आता यमनमधील हूती बंडखोरांच्या सहभागामुळे आणखी एक महत्त्वाचा मार्ग ‘बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी’ही धोक्यात आला आहे. हूतींकडून या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बाब-अल-मंदेब हा आशिया आणि आफ्रिका यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग असून तो लाल समुद्राला अदनची खाडी आणि पुढे हिंदी महासागराशी जोडतो. युरोप आणि आशियामधील व्यापारासाठी हा एक प्रमुख मार्ग मानला जातो. सुमारे १०० किलोमीटर लांबीचा हा मार्ग काही ठिकाणी केवळ ३० किलोमीटर रुंद असल्यामुळे अत्यंत संवेदनशील मानला जातो.
स्वेझ कालवा सुरू झाल्यानंतर या मार्गाचे महत्त्व अधिक वाढले. आज जगातील मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक आणि तेलवाहतूक याच मार्गातून होते. २०२३ मध्ये दररोज सुमारे ९.३ दशलक्ष बॅरल तेल या मार्गातून जात होते, जे जागतिक समुद्री तेल व्यापाराच्या सुमारे १२ टक्के आहे.
मात्र २०२४ पासून हूती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तेलवाहतूक जवळपास निम्म्यावर आली असून याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर आणि किमतींवर होत आहे.
सध्या परिस्थिती अधिक गंभीर मानली जात आहे कारण हॉर्मुझ आणि बाब-अल-मंदेब हे दोन्ही महत्त्वाचे मार्ग एकाच वेळी धोक्यात आले आहेत. हॉर्मुझमधून जगातील सुमारे २० ते २५ टक्के तेल वाहतूक होते. जर हे दोन्ही मार्ग प्रभावित झाले, तर जागतिक तेल व्यापाराच्या ३० ते ३५ टक्के पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर होऊन अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. जहाजांना पर्यायी मार्गाने आफ्रिकेला वळसा घालावा लागत असल्याने प्रवासाचा कालावधी २७ दिवसांवरून ४० ते ५० दिवसांपर्यंत वाढत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून महागाईचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
भारतासाठी ही परिस्थिती काही प्रमाणात चिंताजनक असली तरी थेट परिणाम मर्यादित राहू शकतो, कारण भारताचा बहुतांश तेलपुरवठा या मार्गावर अवलंबून नाही. मात्र हॉर्मुझमधील तणावामुळे भारतावर अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, बाब-अल-मंदेब पूर्णपणे बंद करणे कठीण आहे, कारण हा मार्ग तुलनेने रुंद आहे आणि येथे अनेक देशांची लष्करी उपस्थिती आहे. तरीही हल्ल्यांमुळे निर्माण होणारी भीती आणि अनिश्चितता जागतिक व्यापारासाठी मोठा धोका ठरू शकते.