- ईटियाडोह कालव्यात वाहून गेलेल्या १९ वर्षीय पायलचा दुर्दैवी मृत्यू
- २४ तासांच्या शोधानंतर सापडला मृतदेह
अर्जुनी मोरगाव,
तालुक्यातील मोरगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. पोलिस बनून कुटुंबाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहणार्या १९ वर्षीय पायल वामन शहारे हिचा Death by drowning in the Ettiadoh Canal ईटियाडोह कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल २४ तासांच्या अथक शोधानंतर तिचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मंगळवारी (ता. ३१ मार्च) सकाळी आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रब्बी हंगामामुळे ईटियाडोह कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून कालवा दुथळी भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत सोमवारी (ता. ३० मार्च) सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास पायल ही नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी कालव्याकाठी गेली होती.
Death by drowning in the Ettiadoh Canal मात्र, पाय घसरल्याने ती अचानक खोल पाण्यात पडली आणि वेगवान प्रवाहामुळे क्षणार्धात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. नातेवाईक, ग्रामस्थ, पोलिस प्रशासन व तालुका यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कालव्यातील पाण्याची पातळी सुमारे २० फूट असल्याने शोधकार्य अत्यंत कठीण झाले होते. अखेर ईटियाडोह सिंचन विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतरही अखंड शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. तब्बल २४ तासांच्या प्रयत्नांनंतर मंगळवारी सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास पायलचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आढळून आला. पायल ही अत्यंत बुद्धिमान, जिद्दी व मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. आपल्या कष्टाच्या जोरावर पोलिस दलात भरती होण्याचे तिचे मोठे स्वप्न होते. यासाठी ती नागपूर येथे जाऊन तयारी करत होती. मात्र नियतीने तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले आणि तिचे आयुष्य अकाली संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे मोरगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकर्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.