देवळी मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांवर जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक

*आ. बकानेंनी मांडल्या समस्या

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
deoli-constituency : देवळी मतदारसंघातील विविध प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आ. राजेश बकाने यांनी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत संबंधित सर्व विभागीय अधिकार्‍यांना तात्काळ बोलावून येत्या आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
 

K 
 
 
 
यावेळी आ. बकाने यांनी मतदारसंघातील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मांडल्या. विशेषतः सिरूड लघु सिंचन प्रकल्पामुळे बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळणे, बॅकवॉटरमुळे प्रभावित होणार्‍या शेतजमिनींचे अधिग्रहण, एकुर्ली येथे मोबाइल टॉवर स्थापनेबाबत नागरिकांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. भूगाव परिसरातील इवोनिथ कंपनीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नागरिकांच्या समस्या व सीएसआर निधीतून विकासकामे राबविण्याबाबतही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पुलगाव शहरातील हिंगणघाट फैल, बरांडा आणि हाउसिंग बोर्ड कॉलनीतील प्रकरणांमध्ये नागरिकांच्या कायदेशीर हकांचे संरक्षण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
इंझापूर येथील डम्पिंग यार्डच्या प्रश्नावरही तातडीने उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले. नाचणगाव व गाडगेनगर परिसरातील नागरिकांच्या कायदेशीर हकांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन तातडीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी करीत देवळी मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. नागरिकांच्या समस्यांवर प्रशासनाने तातडीने सोडवाव्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी या विषयांवर गांभीर्याने विचार करून संबंधित विभागीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
 
 
याप्रसंगी राहुल चोपडा, आशिष गांधी, नितीन बडगे, वामन खोडे, सूरज सुरस्कार, सतीश जयसिंगपुरे, निलेश किटकुले, ज्ञानेश्वर ढगे आदी उपस्थित होते.