विकासकामे कागदावर नाही, तर प्रत्यक्षात करा

-आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे अधिकार्‍यांना कडक निर्देश -सिरोंचा येथे पार पडली आढावा बैठक

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
सिरोंचा, 
dharmaraobaba-atram : विकासकामे फक्त फाईलपुरती मर्यादित राहून चालणार नाहीत, तर ती जमिनीवर दिसली पाहिजेत आणि त्याचा थेट लाभ सामान्य नागरिकांना झाला पाहिजे, असा स्पष्ट आणि ठाम निर्देश अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सिरोंचा येथे घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकार्‍यांना दिला. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, तसेच विलंब आणि हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
 
 
KL
 
 
 
येथील तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेताना आमदारांनी विशेषतः रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि शिक्षण या मूलभूत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. या बैठकीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांवरही निर्णायक पावले उचलण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या पाच ते सहा दशकांपासून शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना स्थैर्य मिळणार असून त्यांच्या आयुष्यातील अनिश्‍चितता दूर होणार आहे.
 
 
याचबरोबर सिरोंचा येथे समाज मंदिर आणि रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजनही आमदारांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमुळे स्थानिक पातळीवर सुविधा वाढून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार डॉ. आत्राम यांनी केवळ बैठकीपुरते काम न ठेवता सलग तीन दिवस तालुक्यात दौरा करत गावागावांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकून त्या त्वरित सोडवण्यावर त्यांनी भर दिला. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी अधिकार्‍यांशी थेट संपर्क साधून जागेवरच तोडगा काढल्याचे दिसून आले.
 
 
एकंदरीत, आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सक्रिय भूमिकेमुळे सिरोंचा तालुक्यात प्रशासन आणि जनतेमधील दुवा अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे. सातत्याने सुरू असलेल्या या विकासाभिमुख उपक्रमांमुळे तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.