- प्रचार-प्रसिद्धीचा अभाव : शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात
- गोंदियाकरांसह पूर्व विदर्भातील नागरिक व बचत गटांची पाठ
गोंदिया,
ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान (उमेद) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ मार्च या कालावधीत आयोजित ‘Divisional Sales and Marketing Festival 2026’ ‘विभागीय सरस व विक्री महोत्सव २०२६’ फुसकाबार ठरला असून संबंधित विभागाकडून या महोत्वाची व्यापकस्तरावर प्रचार-प्रसिद्धी करण्यात न आल्याने गोंदिया जिल्ह्यासह नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यातील नागरिकांसह बचत गटांनी या महोत्सवाकडे ढुकूंनही पाहिले नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या असून प्रचार प्रसिद्धीचा खर्च कुठे झाला? असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित केला जात आहे.
‘Divisional Sales and Marketing Festival 2026’ ग्रामीण भागातील महिला स्वयं सहायता समूहातील महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनस्तरावर ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने ‘सरस महोत्सव’ हे उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २९ ते ३१ मार्च या कालावधीत गोंदियात विभागीय सरस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रदर्शनीत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील स्वयं सहायता समूहांचा सहभाग राहणार असल्याचे सांगत ग्रामीण समूहातील महिलांनी बनवलेल्या आकर्षक वस्तू, हस्तकला, आणि गृहोपयोगी वस्तू, मसाले, लोणची, पापड आणि सेंद्रिय धान्य यांची प्रदर्शनी/विक्री व दररोज सायंकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी या प्रदर्शनीत राहणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत होते. मात्र, विभागस्तरावरील महोत्सवाच्या निमीत्ताने अपेक्षित अशी प्रचार-प्रसिद्धी करण्यात संबंधित विभागाकडून आखडता हात घेण्यात आला. त्यामुळे नागपूर विभाग तर दूर गोंदिया जिल्ह्यातील नागरिक व समूह गटांनाही या महोत्सवाची माहिती मिळू शकली नाही. परिणामी या महोत्सवात संबंधित विभाग व जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचार्यांसह स्टॉल लावणार्या महिलांव्यतिरीक्त कुणीही दिसून आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात आयोजित हे विभागीय सरस महोत्सव सस्पेशल ‘फ्लॉप’ ठरले. तर शासनाच्या लाखो रुपयांची केवळ उधळपट्टी करण्यात आल्याचे चित्र या महोत्सवातून पहावयास मिळाले.