गोंदिया जिल्ह्यात ‘जनगणना-२०२७’ चा मुहूर्त !

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
- पहिल्या टप्प्यात १६ मे पासून ‘घरयादी व घरगणना’ला सुरुवात

गोंदिया, 
Gondia: 'Census-2027' भारताच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्वाची असलेली ‘जनगणना-२०२७’ आता प्रत्यक्षात सुरु होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा, ‘घरयादी व घरगणना’आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून यासाठी संबंधितांना तसे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आहे.
 
 
jan
 
Gondia: 'Census-2027'  जिल्ह्यात आगामी जनगणना-२०२७ च्या पुर्वतयारीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाकरीता जिल्ह्यातील सर्व जनगणना अधिकारी, चार्ज जनगणना अधिकारी (सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद/नगरपंचायत) तसेच अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी, जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालय, नगर परिषद/नगरपंचायत कार्यालयातील जनगणना लिपिक व तांत्रिक सहाय्यक यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे २३ ते २५ मार्च या कालावधीत यशस्वीरित्या पार पडले असून जनगणना संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई मार्फत सहायक संचालक जोगेंद्र तामगाडगे, तसेच चेतन गायधने व जितेंद्र कुमार या अधिकार्‍यांना जनगणना-२०२७ च्या तयारीच्या उपक्रमांचा भाग म्हणून गोंदिया जिल्ह्याकरीता प्रशिक्षण देण्यासंदर्भात नेमले आहे. या अधिकार्‍यांनी तीन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये करावयाचे कार्य, पायाभूत स्तरापासून तर अंतिम टप्प्यापर्यंतच्या सगळ्या बाबतीत सविस्तर प्रशिक्षण दिले. असून सदर प्रशिक्षणावेळी जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी प्रजित नायर, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी या प्रशिक्षणाद्वारे गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जनगणना-२०२७ करीता सहयोग करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कार्यालय
गोंदिया येथे जनगणना-२०२७ करीता स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जनगणनाविषयी महत्वाची माहिती तसेच आकडेवारी इत्यादी बाबतीत समन्वयाचे कार्य या कक्षामार्फत होणार आहे.
- भैय्यासाहेब बेहेरे
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी