सरकारी सण आणि ‘गतीचे गाणे’...

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
 
अग्रलेख 
 
march end केवळ निर्णयांच्या कागदी घोड्यांच्या फौजा दमदारपणे दौडविल्याने शासन किंवा प्रशासनास गतिमानता प्राप्त होते, असे समजण्याएवढा दुधखुळेपणा अलिकडे समाजात अभावानेच आढळत असल्याने, ‘कार्यक्षमता दाखवा आणि जनाधार मिळवा’ हा आजकालच्या सत्तासंघर्षातील मतदारांच्या ताकदीचा मंत्र झाला आहे. अशी कार्यक्षमता दाखविण्यासाठी, शासन व्यवस्थेला आणि सरकारी कामकाजाच्या रथाचे दुसरे चाक मानले जाणाऱ्या प्रशासनास आपल्या साऱ्या क्षमता पणाला लावाव्या लागतातच, पण त्याला तिजोरीची साथ मिळणेही गरजेचे असते. सरकारी तिजोरीची दारे खुली केल्याखेरीज निर्णयांच्या कागदी घोड्यांना अंमलबजावणीचा पोषक खुराक देणे शक्य होत नाही. म्हणून, निर्णय आणि अंमलबजावणी हे कोणत्याही शासनाच्या गतिमानतेचे दोन मापदंड लावूनच मतदार कोणत्याही सरकारांच्या क्षमतांचे मोजमाप करत असतो. याची जाणीव आजकाल शासन आणि प्रशासनास अनुभवातून होऊ लागल्याने दिरंगाई, कानाडोळा, उदासीनता असे शब्द शासनाच्या एकंदर व्यवहारांतून हद्दपार करणे हाच जनाधार टिकविण्याचा एकमेव मार्ग ठरतो. उदासीनता झटकणे, कानाडोळा संस्कृती संपुष्टात आणणे आणि ‘चलता है’ मानसिकतेस मूठमाती देणे ज्या कारभारास साधते, त्या कारभारास ‘गतिमान कारभार’ म्हणतात. आपले शासन किती गतिमान आहे, याचे मोजमाप करण्याचा हक्काचा दिवस आजच्या तारखेस उगवला आहे.
 
 
 
मार्च एन्ड
 
दरवर्षीच आजच्या तारखेस हा दिवस शासनाच्या गतिमानतेचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा पुरावा जनतेसमोर उभा करत असतो. मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्याने, ‘मार्च एन्ड’ हा परवलीचा शब्द मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्याची सुरुवात होते, तेव्हापासून शासन दरबारी घुमू लागतो आणि मंत्रालयापासून ग्रामपंचायतींपर्यंतच्या साèया सरकारी कार्यालयांना एक वेगळीच धुंदी चढते. मुळात महाराष्ट्रात उत्सवप्रिय मानसिकतेची कमतरता नसल्याने, कोणत्याही एखाद्या निमित्तासोबत उजाडणाèया विशेष दिवसावर उत्सवाचा साज चढविण्यात समाजास आणि एकंदर संस्कृतीसच मोठी हौस असते. त्यामुळे ‘मार्च एन्ड’ अशा सर्वपरिचित नावाने वर्षातून एकदाच येणारा हा दिवसदेखील उत्सवासारखा साजरा व्हावा यात नवल नाही. सरकारी कर्मचाèयांसाठी गुढीपाडवा, रामनवमीसारखे दिवस सुटीचे असतात. एखाद्या सप्ताहान्ताच्या सुटीस जोडून असे काही सणासुदीच्या सुटीचे दिवस आले, तर सरकारी कर्मचारी कौटुंबिक सोहळा समजून ते दिवस साजरे करतात. कार्यालयापासून किंवा कामकाजापासून दूर राहून आपले कौटुंबिक कार्यक्रम आखतात. पण अशा सुट्यांच्या दरम्यान येणारा हा मार्च एन्डचा ‘सरकारी सण’ मात्र वेगळा असतो. या सणाला कोणास सुटी मिळत नाहीच, उलट हक्काच्या सुट्यादेखील विसराव्या लागतात आणि कामाला गतिमानता देण्यासाठी कार्यक्षमतेचा सपाटा लावावा लागतो. अशा तèहेने, सुटीचा विसर पाडणारा व अन्यथा ज्याची सवय राहिलेली नसते, अशा, मान मोडून काम करण्याचा हा सोहळा सर्व कार्यालयांत साजरा होतो. त्या सण-सोहळ्याची पूर्वतयारी साधारणतः अखेरच्या आठवड्यापासून सुरू होते. तिजोरीची तोंडे उघडण्याचा सोहळा म्हणूनही या उत्सवाकडे पाहिले जाते. त्याआधीच्या वर्षभरात अनेक तरतुदी तिजोरीबंद अवस्थेत आणि निर्णय बासनबंद स्थितीत सुस्तावल्यागत पडून राहिलेले असतात. मार्च महिन्याची चाहूल सुरू झाली की त्यांना जाग येते. तिजोरी आणि बासनातून बाहेर पडण्याची वेळ झाल्याच्या जाणिवा जाग्या होतात आणि त्या तरतुदी, निर्णय, शासन व प्रशासन यंत्रणांना जाग्या करू लागतात. चालढकल, कानाडोळा हा सरकारी खाक्या मुरलेल्या यंत्रणांना केवळ अशा हालचालींनी जाग येणे सहसा सोपे नसते. शक्य तितकी चालढकल करावी आणि नाईलाज झाल्यावर मगच फायली व कागदपत्रे झटकून कामाला लागावे ही सवय मुरलेल्या यंत्रणा अखेरच्या आठवड्यात कार्यक्षमता दाखविण्यासाठी सिद्ध होतात आणि तिजोरीची तोंडे उघडली जातात. वर्षभरात शासनाने असंख्य निर्णय घेतलेले असतात आणि जनतादेखील या निर्णयांच्या अंमलबजावणीकडे नजरा लावून बसलेली असते. पण केवळ कागदावरचे निर्णय कारभाराला गती देण्यास पुरेसे नसतात. त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणांचा गतिमान कारभार हाच एकमेव उपाय असल्याने, यंत्रणांच्या पावलांना वेग देणारा हा महिना अखेर उजाडतो आणि अखेरच्या आठवड्यातील धावपळीला उत्सवी उधाण येते.
 
कपाटातील, बासनातील आणि संगणकांच्या वेगवेगळ्या फोल्डर्समधील फाईलींना पाय फुटू लागतात. त्यातील साहेबाच्या मंजुरीच्या स्वाक्षरीकरिता तहानलेल्या कागदपत्रांची इकडून तिकडे धावाधाव सुरू होते. ते कामही सहसा सोपे नसते. कोणत्या फाईलीवरील कोणत्या कागदपत्रांवर सही व्हायला हवी, हे ओळखण्यासाठी चाणाक्षपणा अंगी मुरलेल्या यंत्रणांना कधीकधी त्यासाठी ‘चक्रव्यूह’देखील रचावा लागतो. आज त्या धावपळीच्या शर्यतीचा आणि कसरतीचा अखेरचा टप्पा आहे. आज या फाईली, त्यातील कागदपत्रे आणि निर्णयांचे कागदी घोडे अंमलबजावणीच्या अपेक्षेने आश्वस्त होतील आणि बासनबंद अवस्थेतून बाहेर पडल्याच्या समाधानाचा सुस्कारा टाकतील. आठवडाभरात जारी होणाèया शासन निर्णयांनी वर्षभराच्या वेगाला मागे टाकण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला असेल. गेल्या आठवडाभरात, 29 मार्चपर्यंतच्या काळात महाराष्ट्राच्या विविध खात्यांशी संबंधित असलेल्या शासन निर्णयांनी एक हजाराचा टप्पा पार केला. आजचा दिवस मावळेल, तेव्हा कदाचित तो दोन हजारांच्या घरात पोहोचलेला असेल. कारण, वर्षअखेरच्या गतिमानतेचा तोच पुरावा असतो. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी झालेल्या शासन निर्णयांनी दीड हजारांचा पल्ला गाठला होता.
 
त्याच धामधुमीचा मार्च महिना उजाडला की सरकारी कार्यालयातील वातावरण नेहमीच बदलून जाते. एरवी, ‘आजचे काम उद्या करू’ अशा मानसिकतेची सवय झालेल्या यंत्रणा ‘उद्याचे कामही आजच पूर्ण करावे’, अशा अवस्थेत दाखल होतात. 15 मार्चनंतर तर वेळेच्या गणितालाही काळाचे भान येते आणि उत्सव संपण्याच्या आत सारे सोपस्कार पार पाडण्याच्या जाणिवांचा तणावही जाणवू लागतो. चहा-नाश्त्याची परंपरा पार पडल्याखेरीज ज्या टेबलावरच्या कामाचा दिवस सुरू होत नाही, त्या टेबलावरचा चहा थंड होऊन जातो आणि कामाच्या ताणामुळे मन मात्र तापलेले राहते. इतकेच नव्हे, तर शिल्लक रजा संपविण्याचे सतत होणारे हिशेबही अनेकांस विसरावे लागतात.march end रजा मागणे हादेखील गुन्हा वाटावा हे या उत्सवाचे एकमेव वेगळेपण मानले जाते. वर्षभर ज्या कामांना मंजुरीची प्रतीक्षा असते, त्या कामांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अचानक विमानाचा वेग येतो. ज्या कामासाठी निधीची तरतूद झालेली असते, तो वापरला गेला नाही, तर ‘व्यपगत’ होणार आणि तसे झाल्यास शासनाच्या गतिमान कारभाराच्या दाव्याचे वाभाडे निघणार याची प्रामाणिक जाणीव प्रशासनास करून देणारा हा दिवस कार्यसंस्कृतीमधील एक सर्वांत सुसंस्कृत दिवस म्हणून गणला जातो.
 
या काळात केवळ कागदावरच्या निर्णयांना गती येते असेही नाही. काही ठिकाणी अचानक गावोगावीच्या गल्लीबोळातील रस्ते खोदले जातात. नळपाणी योजना सुरू होण्याच्या आशा पल्लवित होतात, रस्त्याकडेच्या दिवाबत्ती योजना गतिमान होतात, सरकारी कार्यालयांतील जुनाट फर्निचर, कपाटे, टेबले हद्दपार होऊन कार्यालयांचे रुपडे बदलून टाकणारे सामान दाखल होते. सणासुदीला घराघरांतही नव्या वस्तूंची खरेदी, नवे कपडे, नवे फर्निचर येते. वर्षअखेरचा हा सोहळादेखील या परंपरेला साजेसा साजरा केला जावा, हे अपेक्षितच असते. अनेक सरकारी कार्यालयांबाहेर कंत्राटदारांची गर्दी सुरू होऊन कार्यालयांना जत्रेचे स्वरूप येते. कागदपत्रांवर मंजुरीच्या स्वाक्षèया उमटल्या की सर्वत्र उत्साहाला उधाण येऊन ‘खुशी’ व्यक्त करण्यासाठी ‘प्रसाद वाटपा’चे सोहळे सुरू होतात. हे सोहळे सर्वांत जास्त जाणवण्याच्या जागेला ‘ट्रेझरी’ किंवा ‘कोषागार’ असे म्हणतात. तिजोरीच्या चाव्या या जागी दडलेल्या असतात. त्यामुळे सोहळ्याची सुरुवात होताच या जागेला युद्धभूमीचे रूप येते. टायपिंगचा खडखडाट. संगणकाच्या कीबोर्डचा नाद, ‘टोकन’ मिळविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि मोजक्या मध्यस्थांची धावपळ असा धामधुमीचा हा सोहळा ‘याचि डोळा’ अनुभवण्याचे भाग्य सामान्य जनतेच्या सहसा नशिबी नसते. आज मध्यरात्री, घड्याळाच्या काट्यांनी बारा वाजल्याचे ठोके दिले की हा सोहळा संपुष्टात येईल. ‘एक एप्रिल’ नावाच्या नव्या दिवसाचे स्वागत सोहळे सुरू होतील. नव्या आर्थिक वर्षाच्या नव्या दिवशी, नवे निर्णय, नव्या तरतुदी आणि नव्या योजनांची कागदी घोडे नव्या ‘नस्त्यां’वर स्वार होतील आणि नव्या वर्षाची वाटचाल सुरू करतील. ‘चलता है’ मानसिकतेच्या दबावाखाली तेदेखील सुस्तावल्यागत होतील, पण नव्या वर्षातही, पुढच्या 31 मार्चचा वर्षअखेरचा दिवस उजाडणारच आहे आणि तेव्हा पुन्हा गतीने धावावे लागणार आहे, याची त्यांना खात्री असते. सरत्या वर्षाच्या पहिल्या दिवशीदेखील हेच झाले होते एवढ्या प्रचंड गतिमानतेची कमाल कसरत झाल्यानंतर दमछाक तर होणारच! उद्या, 1 एप्रिलच्या दिवशी, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी युद्धानंतरच्या शांततेचा एक वेगळ्या अनुभवाने सरकारी कार्यालयांच्या रुळलेल्या सवयी पुन्हा जाग्या होतील.