नवी दिल्ली
shiv-sena-symbol-dispute : शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वादाशी संबंधित महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार १ एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. मात्र, शेवटच्या क्षणी ही तारीख पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा एकदा या प्रकरणाला विलंब झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात अंतिम युक्तिवाद अद्याप बाकी असून, सुनावणी झाल्यास ठाकरे गट सर्वप्रथम आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यांना युक्तिवादासाठी मर्यादित वेळ दिला जाणार असून त्यानंतर शिंदे गट आपले म्हणणे मांडणार आहे.
शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह यावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.