मारेगाव ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरअभावी जीव टांगणीला

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
व्हेंटिलेटर न बसवल्यास थेट उच्च न्यायालयात घेणार धाव

मारेगाव, 
Maregaon Rural Hospital एकीकडे सरकार ‘आरोग्यसंपन्न महाराष्ट्र’चा दावा करत आहे. तर दुसरीकडे मारेगाव तालुक्यातील 114 गावांच्या नशिबी मात्र आजही जीवघेणी हेळसांड सुरूच आहे. मारेगाव ग्रामीण रुग्णालयात अत्यंत आवश्यक असलेले ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘सीटी स्कॅन’ मशीन नसल्यामुळे या आदिवासीबहुल तालुक्यातील बांधवांना आपला जीव मुठीत धरून यवतमाळ किंवा नागपूरची वारी करावी लागत आहे. या गंभीर प्रश्नावर द प्लॅटफॉर्म फॉर जस्टिस अँड ह्युमन राइट्स या संघटनेने आता थेट आरोग्य मंत्र्यांकडे दाद मागितली असून प्रशासनाला 15 दिवसांचा इशारा दिला आहे.
 
 
maregav
 
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार आणि सरकारच्याच मार्च 2025 च्या अहवालानुसार, मारेगाव रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. आणीबाणीच्या प्रसंगी, म्हणजेच ‘गोल्डन अवर’ मध्ये रुग्णाला व्हेंटिलेटर मिळणे आवश्यक असताना, येथे एकही कार्यान्वित युनिट नाही. 100 किलोमीटरचा प्रवास करताना अनेक गरीब रुग्णांनी वाटेतच प्राण सोडल्याच्या घटना घडल्या असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
 
 
Maregaon Rural Hospital संघटनेचे राजीव खोब्रागडे, अ‍ॅड. साहिल शेख व सोहेल सय्यद यांनी स्पष्ट केले आहे की, 15 दिवसांत रुग्णालयात किमान दोन व्हेंटिलेटर आणि सीटी स्कॅन मशिनची व्यवस्था झाली नाही, तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. आयपीएचएस 2022 नियमांनुसार तत्काळ 2 व्हेंटिलेटर बसवावेत. सीटी स्कॅनची कायमस्वरूपी सोय करून 24 तास तंत्रज्ञ उपलब्ध करावा. 114 गावांतील रुग्णांना तत्काळ तातडीची सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे. आरोग्य विभाग या 15 दिवसांत जागे होणार की न्यायालयाची चपराक खाणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नियमांनुसार रुग्णालयात 2 व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन मशिन व 24 तास तंत्रज्ञ उपलब्ध ठेवणे, तसेच 114 गावांतील रुग्णांना तातडीची सेवा मिळणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. सहसुविधा प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक व वैद्यकीय पदांची गरज आहे. ग्रामीण रुग्णालय स्तरावर याबाबत सध्या स्पष्ट निर्देश नसले तरी स्थानिक गरज लक्षात घेता वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळविणे आवश्यक आहे.
डॉ. सुभाष इंगळे
अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मारेगाव