‘पोस्को’ अंतर्गत आरोपीस अटक
तिवसा,
Mozari: Attempted rape of girls येथून जवळच असलेल्या मोझरी येथे घडलेल्या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. स्वामी समर्थ मठातले मंदिर दाखविण्याच्या बहाण्याने तेथीलच एका खोलीत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना २२ मार्च रोजी घडली. २७ मार्च रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर तिवसा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
दाखल फिर्यादीनुसार, मोझरी येथील हायस्कूलमध्ये नववीत शिक्षण घेणार्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी वसतिगृहात राहत असून, रामनवमी उत्सवानिमित्त स्वामी समर्थ मठात गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रांगोळी काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपी संजय बांते (वय ४३, रा. मोझरी) याने त्यांच्याशी ओळख वाढवत प्रसाद देतो असे सांगून मठातील वरच्या भागात असलेले मंदिर दाखविण्याच्या बहाण्याने खोलीत नेले. त्यानंतर आरोपीने दोघींना जबरदस्तीने धरून अश्लिल कृत्य केले. मात्र, प्रसंगावधान राखत एका मुलीने धाडसाने दार उघडून आरडाओरड केली. त्यामुळे दोघीही मुली तातडीने तेथून सुटून वसतिगृहाकडे पळाल्या. घडलेला प्रकार त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोनवर सांगितला. त्यानंतर नातेवाईकांसह तिवसा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल करण्यात आली.
Mozari: Attempted rape of girls या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तिवसा पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी संजय बांते यास अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(२), २२७(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत कलम ८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या कळसे करीत असून, ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.