पीएसएलमध्ये नवा वाद; आफ्रिदीवर शिस्तभंगाची कारवाई

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
इस्लामाबाद,
New controversy in PSL पाकिस्तानमधील प्रमुख टी-२० स्पर्धेत पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला असून शाहीन शाह आफ्रिदी याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. लाहोर कलंदर्स संघाचा कर्णधार असलेल्या आफ्रिदीने स्पर्धेदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप समोर आला आहे.माहितीनुसार, आफ्रिदी आणि त्याचा सहकारी सिकंदर रझा यांनी संघाच्या निवासस्थानी बाहेरील व्यक्तींना परवानगीशिवाय प्रवेश दिला. स्पर्धेच्या सुरुवातीलाच घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. संबंधित व्यक्तींना प्रवेशासाठी परवानगी नाकारण्यात आली होती, तरीही त्यांना हॉटेलमध्ये आणल्याचे उघड झाले. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनीही लक्ष घातले आणि प्रकरण अधिक गाजले.
 
 

New controversy in PSL
घटनेनंतर सिकंदर रझाने जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले जात असले, तरीही संघ व्यवस्थापनाने आफ्रिदीवरही कारवाई केली. नियमभंग केल्याप्रकरणी त्याच्यावर मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे, हा दंड स्वतः त्याच्या संघानेच लावला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संघाकडून सांगण्यात आले की, घटना घडली असली तरी तिचे अनावश्यक मोठे रूपांतर करण्यात आले. मात्र भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खेळाडूंना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे स्पर्धेच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.