६०० निकालांच्या विलंबामुळे विद्यापीठात ‘इमर्जन्सी’ कारवाई
नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हिवाळी सत्राच्या ६०० हून अधिक परीक्षांचे निकाल प्रलंबित राहिल्यामुळे प्रशासनावर तीव्र टीका होत असताना, कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी तातडीची पावले उचलत संबंधित सॉफ्टवेअर कंपनीला नोटीस बजावली आहे. तसेच परीक्षा व मूल्यमापन विभागात मोठा प्रशासकीय बदल करत संचालक मनीष झोडापे यांचा प्रभार काढून तो मोतीराम तडस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यंदा हिवाळी परीक्षा नेहमीपेक्षा सुमारे दीड महिना उशिराने सुरू झाल्या होत्या. नियमानुसार परीक्षा संपल्यानंतर ४० दिवसांत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र अनेक परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. विशेषतः अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरत आहे, कारण पदवीप्राप्ती, उच्च शिक्षणासाठी प्रवेश आणि नोकरीच्या संधी यावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने यंदा सुमारे ११ हजार ५०० परीक्षा घेतल्या असून त्यापैकी केवळ ५०० परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरित ६०० हून अधिक निकाल प्रलंबित असल्याने संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, उन्हाळी परीक्षा जवळ आल्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक काम काही महिन्यांपूर्वी नव्या कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र, जुन्या कंपनीकडून विद्यार्थ्यांचा डेटा योग्य प्रकारे हस्तांतरित न झाल्याने नव्या कंपनीला सर्व माहिती नव्याने नोंदवावी लागत आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत असून त्याचा थेट परिणाम निकालांच्या विलंबावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या कंपनीच्या कार्यक्षमतेबाबत आधीपासूनच शंका व्यक्त करण्यात येत होत्या. विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. सिनेट बैठकीतही या मुद्द्यावर तीव्र चर्चा झाली होती.
या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी कठोर भूमिका घेत कंपनीला कामात सुधारणा करण्यासह मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच परीक्षा विभागाचे स्थलांतर लवकरच करण्यात येणार असून, प्रशासनाने निकाल लवकर जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. “तांत्रिक अडचणी दूर होताच पुढील परीक्षा वेळेत पार पडतील,” असा विश्वास कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.