‘त्या’ अपूर्ण चौकशीची मुख्यमंत्री सचिवालयाकडून दखल

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
- आमगावच्या बाह्मणी येथील कोट्यावधी घोटाळा प्रकरण

गोंदिया, 
Scam case आमगाव तालुक्यातील बाह्मणी येथील विकासकामांत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीतील विलंबाबाबत थेट मुख्यमंत्री सचिवालयाने दखल घेतली असून या प्रकरणातील तक्रारदार छगन भेदे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे हे संपूर्ण प्रकरण आता तातडीने चौकशीसाठी संबंधित विभागाकडे सोपविले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या चौकशीला आता मोठी गती मिळणार आहे.
 
Scam case
 
Scam case  बाह्मणी येथे ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात असताना प्राथमिक चौकशीत केवळ ११.३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. मात्र, हा आकडा कोट्यवधींच्या घरात असण्याची शंका वर्तवण्यात येत आहे. याबाबत छगन भेदे यांनी केंद्र सरकारच्या ‘पीजी पोर्टल’वर रितसर तक्रार दाखल केली होती. मात्र, स्थानिक यंत्रणेमार्फत करण्यात आलेली चौकशी अत्यंत संथ, त्रुटीपूर्ण आणि अपूर्ण स्वरूपाची असल्याने, दोषींना पाठीशी घातले जात असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रशासकीय दिरंगाईचे हे गंभीर स्वरूप आणि चौकशीतील विसंगती पाहून छगन भेदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. त्यांनी ही फाइल ‘री-ओपन’ करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. यावर मुख्यमंत्री सचिवालयाने तत्काळ दखल घेत सदर तक्रार आता योग्य त्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे अधिकृतपणे पाठविण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या या पत्रामुळे स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मुख्यमंत्री स्तरावरून या प्रकरणाची दखल घेतली गेल्याने बाह्मणी येथील वादग्रस्त कामांची पारदर्शक चौकशी होईल, अशी अपेक्षा बाम्हणीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.