सोनिया गांधी रुग्णालयातून घरी परतल्या

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Sonia Gandhi returns home from hospital काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती आता सुधारली असून त्यांना दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्या आता पूर्णपणे बऱ्या आहेत आणि घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील. २४ मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, तपासणीत त्यांच्यावर सिस्टेमिक इन्फेक्शन असल्याचे आढळले. डॉ. डी. एस. राणा, डॉ. एस. नंदी आणि डॉ. अरूप बसू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु केले गेले. अँटीबायोटिक्समुळे लक्षणे सुधारली आणि आज सकाळी त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.
 
 
 
Sonia Gandhi returns home from hospital
 
सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा असून, त्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पत्नी आहेत. त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी इटलीतील व्हेनेटो प्रदेशातील लुसियाना येथे झाला. त्यांनी बालपण ऑर्बासानो येथे घालवले आणि इंग्लंडमधील केंब्रिज येथे शिक्षण घेतले. तिथे त्यांची भेट राजीव गांधी यांच्याशी झाली. १९६८ मध्ये त्यांनी राजीव गांधी यांच्याशी विवाह केला आणि भारतात स्थायिक झाल्या. लग्नानंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले, परंतु सुरुवातीला त्यांनी नकार दिला. १९९७ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि १९९८ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांनी १९९८ ते २०१७ आणि पुन्हा २०१९ ते २०२२ या काळात पक्षाचे नेतृत्व केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून यूपीए सरकार स्थापन केले. २००४ मध्ये विजयानंतर पंतप्रधानपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आणि नंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी हा पद स्वीकारले.