कारागृहातून बाहेर पडताच स्वतःच्या पायावर उभ्या राहणार महिला कैदी
दिनांक :31-Mar-2026
Total Views |
- कैद्यांना हस्तकला आणि लिपण आर्टचे प्रशिक्षण
अनिल कांबळे
नागपूर,
‘Sudharaṇa punarvasan’ कळत-नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे चिरेबंदी कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या महिला कैदी कारागृहातून बाहेर पडताच बेराेजगार राहू नये तसेच त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा, त्यांना पुन्हा समाजाने स्विकारुन प्रवाहात सामावून घ्यावे, यासाठी कारागृह प्रशासन सकारात्मक असते. महिला कैद्यांना काैशल्य प्राप्त व्हावे, यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहाने महिला कैद्यांसाठी हस्तकला व लिपण आर्ट प्रशिक्षण दिले. यातून महिला कैदी सक्षम हाेऊन कुटुंबियांना आर्थिक हातभार लावतील, अशी अपेक्षा कारागृह प्रशासनाने व्यक्त केली आहे.
‘Sudharaṇa punarvasan’ ‘सुधारणा पुनर्वसन’ हे महाराष्ट्र कारागृहाचे ब्रिद असून कारागृहातील कैद्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी कारागृहात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. कारागृह प्रशानाचे राज्य प्रमुख सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांसाठी ‘हस्तकला व लिपण आर्ट प्रशिक्षण’ देण्यात आले. या प्रशिक्षणात कारागृहातील 80 महिला कैद्यांनी सहभाग घेतला हाेता. प्रशिक्षणादरम्यान महिला कैद्यांनी ेब्रिक पाऊच, टाेट बॅग, क्ले ज्वेलरी, वारली पेंटींग व क्ले पेपर वेट इत्यादी सुबक व आकर्षक वस्तू तयार करण्याचे कसब हस्तगत केले. महिला कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी यासाठी कारागृहाच्या विक्री केंद्रामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या हाेत्या. त्या वस्तुंची माेठ्या प्रमाणात विक्री झालेली असून कारागृहाच्या उत्पन्नात भर पडली आहे.
समाजापर्यंत वस्तू पाेहचाव्यात
महिला कैद्यांच्या परिश्रमाचे चीज व्हावे आणि त्यांनी हस्तकलेतून साकारलेल्या कलाकुसरीच्या वस्तू समाजापर्यंत पाेहचाव्यात. सामान्य नागरिकांनी त्या वस्तूंची खरेदी करुन प्रतिसाद द्यावा. कारण कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची मागणी वाढावी आणि महिला कैद्यांच्या कलेला वाव मिळून आर्थिक हातभार लागावा, अशी आशा अति. अधीक्षक दीपा आगे यांनी केली आहे.