सेलू तालुक्यात वाघाची दहशत

*हिवरा शिवारात वासरावर हल्ला

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
सेलू, 
tiger-terror-in-selu-taluka : तालुक्यात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरगावजवळील हिवरा शिवारात वाघाने वासरावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.
 
 
TIGER
 
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरा शिवारात शेतकरी भाऊसाहेब ठाकरे यांच्या शेतात ही घटना घडली. शनिवारी रात्री गोठ्यात बांधलेल्या गाईच्या कळपावर वाघाने हल्ला चढवला. यात दोन वर्षाच्या वासराचा फडशा पाडला. सकाळी शेतमालक शेतात पोहोचले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच बीटातील वनरक्षक सुनील कोटजावळे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परिसराची पाहणी करताना जमिनीवर वाघाचे पावलांचे ठसे आढळून आले. यावरून हा हल्ला वाघानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
दरम्यान, परिसरात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकामासाठी जाण्यासही मजूर नकार देत आहेत. जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यत केली जात आहे. वनविभागाने केवळ पंचनामा न करता या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.