तभा वृत्तसेवा
आर्णी, 4 मार्च
auto-accident-due-to-monkey-jumping : आजीला दिग्रस येथे दवाखान्यात घेऊन जात असताना चालत्या ऑटोवर माकडाने उडी घेतल्याने ऑटोचा अपघात झाला. या अपघातात पुष्पा अरुण तांबे (वय 24, नाथनगर भंडारी, ता. आर्णी) ही ठार झाल्याची घटना सोमवार, 2 मार्चला दुपारी 4 वाजता घडली.
नाथनगर भंडारी येथून दिग्रस येथे आजी कचराबाई शिंदे हिला दवाखान्यात घेवून जाण्यासाठी एक अॅपे ऑटो भाड्याने करून त्यात कचराबाई दगडू शिंदे, पुष्पा अरुण तांबे, विकास माणिक शिंदे, गुंफा माणिक शिंदे हे दिग्रसला दवाखान्यात जात होते.
याच वेळी दिग्रस आर्णी रस्त्यावर धानोरा (बु) जवळील अरुणावती कॉलनीलगत पेट्रोलसमोर या ऑटोवर माकडाने उडी मारली. त्यामुळे ऑटो दोन-तीन पलट्या घेत रस्त्याच्या खाली आडवा झाला.
या अपघातात कचराबाई शिंदे, विकास शिंदे जखमी, तर पुष्पा तांबे ही गंभीर जखमी झाल्याने तिला दिग्रसला रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेले. तेथून डॉक्टरांनी तिला यवतमाळला पाठविले. पण पुष्पाची प्रकृती बिघडल्याने तिला आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
मृतक पुष्पा तांबे हिचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी आर्णी ग्रामीण रुग्णालयात घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु आर्णी पोलिस ठाणेदार नीलेश सुरडकर यांनी नातेवाईकांची समजूत काढून शवविच्छेदन करावेच लागते अशी समजून काढल्याने अखेर मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आला.