होळीच्या नावाखाली गाईला जबरदस्ती पाजले मद्य!

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Cow forced to drink alcohol संपूर्ण देशात होळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच हरियाणामधून समोर आलेल्या एका धक्कादायक दृश्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक माध्यमांवर वेगाने पसरलेल्या एका चलतचित्रात काही तरुणांनी होळीच्या नावाखाली गायीशी अमानुष वर्तन केल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या चलतचित्रात काही तरुण मद्यधुंद अवस्थेत बैलगाडीत बसलेले दिसतात. ती गाडी एक गाय ओढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी दोघांनी गायीचे तोंड जबरदस्तीने उघडून तिला मद्य पाजल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिला पुन्हा गाडी ओढण्यास भाग पाडल्याचेही दिसते. या संपूर्ण प्रकारादरम्यान आसपास उपस्थित असलेल्या काही लोकांनी हस्तक्षेप न करता तमाशा पाहिल्याचेही बोलले जात आहे. या कृत्याला अनेकांनी विकृतीचा कळस असे संबोधले आहे.
 
 

haryana cow news holi 
हे दृश्य एका प्राणीसंवर्धनाशी संबंधित पानावरून प्रसिद्ध झाले असून लाखो लोकांनी ते पाहिले आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी हरियाणा पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजातील बिघडत चाललेली मानसिकता समोर येत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे. संबंधित तरुणांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. भारतामध्ये प्राण्यांवरील क्रूरता रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. प्राण्यांना जाणीवपूर्वक इजा करणे, त्यांना अंमली किंवा मद्यपदार्थ देणे अथवा त्यांच्याकडून अति श्रम करून घेणे हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर कठोर गुन्हे दाखल होऊ शकतात. दरम्यान, या घटनेने सणाच्या आनंदावर विरजण पडले असून प्राणीसंवर्धनाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.