वर्धेत मुंबईचे बोगस आयकर अधिकारी पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
fake-income-tax-officer : आम्ही मुंबई येथील आयकर अधिकारी असून तुमच्या घराची झडती घ्यायची आहे, त्यासाठी कागदपत्र दाखवा. आम्ही सर्चवॉरंट सोबत आणला आहे, असे म्हणून धमकी देणार्‍या बोगस आयकर अधिकार्‍यांना अखेर रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना आज बुधवार ४ रोजी दुपारी घडली.
 
 
 
wardha
 
 
 
प्रवीण हिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक रामनगर परिसरातील श्रीनिवास कॉलनी येथील रहिवासी चिंतामण डोंगरे (८०) यांच्या निवासस्थानी आज दुपारी २ वाजताच्या सुमारास किशन ज्ञानेश्वर पर्बत व चेतन रमेश चव्हाण हे आले. त्यांनी आपण आयकर निरीक्षक असल्याचे सांगून आयकर विभागाचे ओळखपत्र सुद्धा दाखविले. आयकर विभागाचा सर्च वॉरंट दाखवत आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. सर्व कागदपत्रे व रोख रकम दाखवा, असे धमकावू लागले. घरच्यांनी त्यांना कागदपत्र दिले. सोबत आयकर अधिकारी म्हणून आलेल्यांनी घराचे शुटींगसुद्धा करणे सुरू केले.
 
 
या घटना क्रमाची माहिती चिंतामण डोंगरे यांचे चिरजीव प्रा. सुहास यांनी येथील काँग्रेसचे नेते शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांना दिली. प्रवीण हिवरे उद्योजक असल्याने त्यांनी डोंगरे यांना काही महत्त्वाचा सल्ला देत आमच्या चाटर्ड अकाउंटनला बोलवतो, असे सांगा. असा सल्ला देताच बनावट आयकर अधिकार्‍यांनी आम्हीच सीएकडे येतो, असे सांगितले. प्रा. डोंगरे, सीए जगदीश चांडक यांच्याकडे दोन्ही बोगस अधिकार्‍यांना घेऊन गेले. दरम्यान, त्या ठिकाणी शेंडे व हिवरेसुद्धा पोहोचले. या दोघांनी मुंबईहून आलेल्या दोन्ही अधिकार्‍यांची उलटतपासणी सुरू करताच त्यांना घाम फुटला. त्यांच्याकडे असलेले नियुतीपत्र सुद्धा बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर व वर्धा पोलिस कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. सर्व शहानिशा केल्यानंतर मुंबईहून आलेले दोन्हीही अधिकारी बोगस असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांना रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.