अंजनगाव सुर्जी,
goats-die-poisonous-water : तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एका शेतात असलेल्या तळ्यातील पाणी पिल्याने ५१ बकर्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली .
माहितीनुसार, पांढरी मासमापुर येथील मासुम महीला बचत गटाच्या महीला दररोज प्रमाणे बकर्यांना चारण्यासाठी शिंगमोडी नदीकाठी गेल्या होत्या. अंदाजे १० वाजता नंतर बकर्यांना पाणी पाजण्यासाठी महीलांनी शेतकरी श्रीकांत रुचके यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी तात्पुरात्या तयार केलेल्या तळ्यातील पाणी पाजण्यास सांगितले. त्यानंतर बकर्यांनी पाणी पिल्यानंतर काही वेळातच एकामागून एक बकर्या जमीनीवर कोसळायला लागल्या. बकर्यांना काय होत आहे हे कळायच्या आधीच बकर्या मरायला लागल्या. संबधित महिलांनी गावात फोन करायला सुरवात केली. परंतु, डॉक्टर यायच्या अधीच बकर्या पायघासत जिव सोडत होत्या. हे बघून बकर्या घेऊन आलेल्या महिलांनी एकच टाहो फोडला आणि घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेत एकूण ५१ बकर्या दगावल्याने संबंधित महिलांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या महिला ‘मासूम महिला बचत गट, मासमपूर पांढरी’ याच्या सदस्य असून त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून सुमारे ६ लाखाचे कर्ज घेतले होते. बकर्यांच्या पालनपोषणावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. या घटनेत नुकसान झालेल्या महिलांमध्ये शमशाद बी मोहम्मद रियाज, शहनाज बी वाईद खा, जयबून बी सालीमुद्दीन, हुस्ना बी शेख हमीद,शमाबी ईस्राईल खा, शबाना बी सलमान खा, शकिला बी सय्यद रियाजूदिन व सलामा बी शेख इरफान यांचा समावेश आहे. या महिलांनी संबंधित शेत मालकावर गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई मीळण्याची मागणी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार सुरज बोंडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. न्याय वैद्यकीय पथकाला पाचारण केले. बकर्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे लवकरच उघड होईल. मात्र, ज्या महीलांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बँकेचे कर्ज काढून बकर्या विकत घेतल्या त्यांच्यासाठी ही फार मोठी घटना आहे.