एसटी बस व हार्वेस्टरची समोरासमोर धडक

सावरकर चौकातील घटना

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड, 
bus accident नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील कारंजा शहरालगतच्या सावरकर चौकात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एसटी बस व हार्वेस्टर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे सुमारे ७२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
 
एसटी बस व हार्वेस्टरची समोरासमोर धडक
 
 
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. १४-११५८ क्रमांकाची वणी आगाराची एसटी बस वणीहून अकोलाकडे प्रवास करत होती. दरम्यान सावरकर चौकात समोरून येणार्‍या हार्वेस्टरने बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की एसटीच्या समोरील काच पूर्णतः फुटली, रेडिएटर व हवेचे पाईप यांचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेनंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. या संदर्भात एसटी चालकाने कारंजा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
 
या निमित्ताने द्रुतगती मार्गावर वाढती जड वाहनांची वर्दळ, चौकातील अपुरी सिग्नल व्यवस्था व बेफिकीर वाहनचालक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.bus accident नागपूर संभाजीनगर मार्ग हा वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असल्याने संबंधित विभागाने सावरकर चौकात तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.