महाराष्ट्रात उष्णतेचा चटका वाढला 'या' जिह्यांना यलो अलर्ट

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra heatwave राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याने जोर धरला असून ४ मार्च रोजी राज्यभर उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानात लक्षणीय वाढ होत असून काही भागांत उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना देण्यात आली आहे. विशेषतः विदर्भात तापमानाचा पारा झपाट्याने चढताना दिसत आहे.
 

Maharashtra heatwave, Mumbai yellow alert 
विदर्भातील अकोला येथे तापमानाने ३८ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला असून आजही तीव्र उन्हाचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३८ अंशांदरम्यान राहील, तर किमान तापमान २० ते २३ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या सुमारास उष्ण व कोरडे वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण पट्ट्यात उष्णतेसोबतच Maharashtra heatwave  दमट हवामानाचा त्रास अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरण राहील. मुंबईत कमाल तापमान ३३ ते ३७ अंश सेल्सियस दरम्यान, तर किमान तापमान सुमारे २२ अंश राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात वाढ नोंदवली जात आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे कोरडे व उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल तापमान ३२ ते ३५ अंश, तर किमान १६ ते १९ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथेही तापमानात वाढ होणार असून नाशिकमध्ये दिवसा ३२ ते ३६ अंश, तर रात्री १८ ते २१ अंश तापमान राहील. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या भागांत उष्ण व कोरडे वातावरण कायम राहील.एकंदरीत, राज्यभर उन्हाळ्याचा चटका तीव्र होत असून पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे, शक्यतो दुपारच्या वेळेत थेट सूर्यप्रकाश टाळावा तसेच उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.