नाशिक,
Malati Infertility Treatment Center बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीजांच्या अवैध विक्री प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत नाशिकमधील मालती वंध्यत्व उपचार केंद्राचे संचालक डॉ. अमोल पाटील यांना अटक केली आहे. बदलापूर पोलिसांनी तीन मार्चच्या रात्री उशिरा ही कारवाई केली. या प्रकरणात त्यांच्यावर सरोगसीसाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप आहे. आज त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तपासादरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचे समोर आले होते. स्त्रीबीजांच्या अवैध व्यवहारामागे आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत जाळे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बदलापूरमधूनच हे जाळे चालवले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. वंध्यत्व उपचार केंद्राच्या नावाखाली हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप होत असून संबंधित एजंटांचीही चौकशी सुरू आहे. नाशिक महापालिकेने डॉ. पाटील यांना नोटीस बजावली असून केंद्रातील कागदपत्रांची तपासणी होणार आहे.
बदलापूरमध्ये हे संपूर्ण प्रकरण एका घरातून चालवले जात असल्याचे उघड झाले. सुलक्षणा गाडेकर या महिलेने घरातच स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शने बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून ही इंजेक्शने देण्यात येत होती. त्यानंतर त्यांच्या शरीरात स्त्रीबीजांची वाढ झाल्यावर त्यांना वंध्यत्व उपचार केंद्रात पाठवले जात होते. तेथे शस्त्रक्रियेद्वारे स्त्रीबीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने गाडेकर यांच्या घरी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या अवैध व्यवहारामागील मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.