सिंदी रेल्वे,
nursery-in-primary-schools : शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नगरपरिषदच्या सर्वसाधारण सभेत नवीन शैक्षणिक सत्रापासून शहरातील प्राथमिक शाळांमध्ये नर्सरी वर्ग सुरू करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
नगरपरिषद सभागृहात आज ४ रोजी झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष राणी कलोडे, उपाध्यक्ष अकील शेख, मुख्याधिकारी पौर्णिमा गावित व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी लहान वयोगटातील मुलांसाठी नर्सरी वर्गाची आवश्यकता अधोरेखित करण्यात यावी तसेच शहरातील वाढती लोकसंख्या आणि पालकांची मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण सभापती राजश्री बोरीकर यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक सत्रापासून नगरपरिषदच्या प्राथमिक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षक तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून नर्सरी सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या निर्णयामुळे लहान मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार असून पालकांची आर्थिक व वेळेची बचत होणार आहे.