वर्धेत नवीन वनभवन; २३ कोटी २९ लाख मंजूर

* पालकमंत्री डॉ. भोयर यांचे प्रयत्न

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
pankaj-bhoyar : येथील उपवनसंरक्षक कार्यालयाची इमारत अत्यंत जुनी व प्रशासकीयदृष्ट्या अपुरी होती. दरम्यान, अलीकडेच बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक कार्यालयास मंजुरी मिळाल्याने वन विभागाच्या कामकाजात आणखी वाढ झाली. याशिवाय वन विभागाच्या अखत्यारितील सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालयही वेगळ्या ठिकाणी कार्यरत होते. ही बाब लक्षात घेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वनभवनासाठी पाठपुरावा केला. महसूल व वन विभागाने वनभवनासाठी २३ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 
 
 
bhoyar
 
 
 
शहरातील सिव्हिल लाईन परिसरात उप वन संरक्षक यांचे कार्यालय आहे. या इमारतीचे बांधकाम बरेच जुने आहे. वन विभागाच्या अखत्यारीतील अन्य कार्यालय इतरत्र असल्याने प्रशासनिक दृष्ट्या सोयीचे नव्हते. शेतकरी, नागरिक व लाभार्थ्यांना वनविभागाशी संबंधित विविध कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धा येथे सर्व उप वन संरक्षक कार्यालय परिसरात स्वतंत्र व सुसज्ज वनभवन उभारण्यासाठी पुढाकार घेतला. वन विभाग, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कार्यालय आणि सामाजिक वनीकरण विभागाची कार्यालये एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
 
 
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात तिन्ही विभागांसाठी एकत्रित वनभवन उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला. ४,९८९.२१ चौ. मीटर क्षेत्रात होणार्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २३ कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी वन मंत्री गणेश नाईक यांची मागील आठवडयात भेट घेऊन वन भवनाच्या इमारतीसाठी निधी देण्याची मागणी केली होती. एका आठवडयात वनमंत्री नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले.