तभा वृत्तसेवा
पुसद,
indranil-naik : औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 71.91 कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने येथील उद्योगविश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रस्तावास हिरवा कंदील दिला आहे. पहिल्या टप्प्यात 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) 1992 मध्ये 172.73 हेक्टर क्षेत्रावर पुसद औद्योगिक वसाहत विकसित केली. या क्षेत्रात एकूण 268 भूखंडांचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी 238 भूखंड उद्योजकांना वितरित करण्यात आले आहेत. सध्या 65 भूखंडांवर उत्पादन सुरू आहे. प्रस्तावित सुविधांमुळे बंद व निष्क्रिय युनिट्सना चालना मिळून नव्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.
मान्यता मिळालेल्या प्रस्तावानुसार 4.75 किमी लांबी व 5.5 मीटर रुंदी, तसेच 4.09 किमी लांबी व 7.5 मीटर रुंदीचे सिमेंट रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा अद्ययावत पथदिव्यांची उभारणी तसेच आवश्यक ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात येणार असून, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक आणि सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे.
उद्योजकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मार्शल जॅकवेलपासून औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 350 मिमी व्यासाच्या पाईपलाइनचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय जॅकवेल अॅप्रोच ब्रिजची दुरुस्ती, पंपिंग मशिनरीचे नूतनीकरण, जॅकवेलसाठी सोलर सिस्टिम कार्यान्वित करणे, तसेच जलशुद्धीकरण केंद्र व फायर स्टेशनची दुरुस्ती व सुधारणा या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे एमआयडीसीच्या वार्षिक महसूल आराखड्यातून राबविण्यात येणार आहेत.
या विकासकामांसाठी पाठिंबा दिल्याबद्दल उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.